Hot Posts

6/recent/ticker-posts

कवठे आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत कोविड सेंटर सुरु

कवठे आरोग्य केंद्राच्या कोविड सेंटरची पाहणी करताना प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी

३० कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सोयींनी आरोग्य केंद्र सज्ज

कवठे वार्ताहर : दिनांक १६ जुलै
कवठे ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये प्रशासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात या केंद्रात तातडीने ३० बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून या केंद्रामध्ये योग्य त्या सुविधा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत दिनांक १५ जुलै रोजी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, गट विकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी आरोग्य केंद्राचे डॉक्टर विजय ठोंबरे व डॉ. गणेश पार्टे यांच्या उपस्थितीत या आरोग्य केंद्रास भेट दिली व केंद्रात कोविड सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व बाबींची पाहणी केली तसेच तातडीने सर्व व्यवस्था करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येथे नुकतीच प्रशस्त व अद्यावत इमारत उभी करण्यात आली आहे. अंदाजे २ कोटी रुपये किमतीचे हे पहिलेच भव्य दुमजली आरोग्य केंद्र असून याच्यामध्ये प्रशस्त ऑपरेशन थिएटर व स्वतंत्र बेडरूम्स तसेच प्रशस्त हाँल आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली हि वास्तू कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनापासून वंचित राहिली व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन न होताच कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली. दिनांक १६ जुलैपासून या केंद्रात रुग्ण दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर , उपसरपंच संदीप डेरे, तलाठी, पोलीस पाटील तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्य उपस्थित होते.

 ग्रामीण भागातील कवठे येथील पहिलेच कोविड केंद्र 

वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातील कवठे येथील कोविड आरोग्य केंद्र हे पहिलेच आरोग्य केंद्र ठरले आहे. मात्र या आरोग्य केंद्रामध्ये दररोजच्या ओ.पी.डी. साठी शंभरहून अधिक रुग्ण येत असल्याने व आता कोविड केंद्र सुरु झाल्याने या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी इतर व्याधींच्या रुग्ण्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. या आरोग्य केंद्रात कोविड केंद्र सुरु झाल्याने इतर रुग्णाच्या संख्येत मात्र घट होणार आहे.
 

Post a Comment

0 Comments