Ticker

6/recent/ticker-posts

अपशिंगे (मि.) येथे पोलीस पथकावर टोळक्याचा हल्ला



सत्य सह्याद्री ऑनलाइन/ शेंद्रे 

मिलिट्री अपशिंगे येथे सुरू असलेल्या चोरट्या दारूधंद्यावर छापा टाकून  परत निघालेल्या बोरगावच्या पोलीस पथकावर  पाच जणांनी हल्ला केला.ही घटना गुरुवारी रात्री घडली.या हल्ल्यात २ पोलीस किरकोळ जखमी झाले.या प्रकरणी दारूविक्रेत्यासह हल्ला करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले असून एक हल्लेखोर पळून गेला आहे.हल्लेखोरांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्यासह अन्य कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपशिंगे (मि.)येथे ओमप्रकाश राठोड हा चोरून दारूविक्री करत असल्याची माहिती समजल्यावर त्यांनी सहाय्यक फौजदार भीमराव यादव,रामचंद्र फरांदे,हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांनी सायंकाळी अपशिंगे (मि.) ते वर्णे जाणाऱ्या रोडलगत छापा टाकून ओमप्रकाश हरिदास राठोड याला रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून देशी दारूच्या छोट्या ३९  व बिअरच्या १० बाटल्या अश्या २४१४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

मुद्देमालासह संशयिताला घेऊन हे पथक पुन्हा बोरगावकडे येत असताना अपशिंगे (मि.) गावच्या एसटी थांब्याजवळ त्यांच्या गाडीला तीन दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकी आडव्या लावून घेराव घातला.यावेळी संकेत राजेंद्र निकम याने ' ओमप्रकाश राठोड माझा मित्र आहे.तुम्ही त्याच्यावर रेड का टाकली?' असे म्हणत शिवीगाळ,दमदाटी करत पोलीस असलेल्या चारचाकी गाडीवर हल्ला केला.यामध्ये गाडीची काच लोखंडी गज मारून फोडली.

त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या नितीन नवनाथ निकम,निरंजन नारायण निकम उर्फ बाळा,श्रीकांत विलास निकम,कृषिकेश शंकर सूर्यवंशी उर्फ सोन्या यांनीही पथकावर हल्ला केला.त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ओमप्रकाश राठोड याला त्यांनी सोडवून नेण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यांना अडवत असलेल्या हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात याना त्यांनी दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाणही केली.यावेळी पोलिसांनी शिताफीने हल्लेखोरांपैकी नितीन निकम व ओमप्रकाश राठोड याला पकडून बोरगाव पोलीस ठाण्यात आणले.या हल्ल्यात हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात किरकोळ जखमी झाले.

पोलिसांनी नितीन निकम यांच्याकडून उर्वरित  हल्लेखोरांनी नावे निष्पन्न करत त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.तर संकेत राजेंद्र निकम उर्फ बिच्चू हा पळून जाण्याचा यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर करत आहेत.

Post a Comment

0 Comments