Ticker

6/recent/ticker-posts

रानडुकरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

वेळे/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वेळे तालुका वाई येथे नवसरीचा माळ या शिवारात एका 80 वर्षीय वृद्धावर पहाटेच्या वेळेस रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने हरिबा कृष्णा नलावडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने वेळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची नोंद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

पोलिस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की, मयत हरिबा कृष्णा नलावडे हे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जेवण करून नेहमीप्रमाणे शेतातील शिवारात गट नंबर 260 मध्ये त्यांच्या मालकीच्या छपरात झोपण्यासाठी गेले. पहाटेच्या वेळेस ते छप्पराबाहेर घरी येण्यासाठी पडले असता त्यांच्यावर रानडुकरांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या छातीला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. त्यांनी डुकरांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. गंभीर मार लागल्याने ते जागेवरच कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

ते लवकर घरी आले नाहीत म्हणून त्यांचा नातू अक्षय अनिल नलावडे वय 18 हा शेतात गेला. त्याला त्याचे आजोबा निपचित पडल्याचे दिसले. याची खबर त्याने घरी दिली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कळविण्यात आले. शवविच्छेदन करून त्यांच्यावर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत हरीबा नलावडे हे माळकरी संप्रदायातील होते. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सोबत फोटो: रानडुकरांच्या हल्ल्यात मयत झालेले हरिबा कृष्णा नलावडे

Post a Comment

0 Comments