सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क /मायणी
सर्वत्र सणाची धामधूम असताना काल सोमवार सकाळच्या प्रहरी मायणी येथील शिंदेवाडी रोड वरील देशमुखवस्ती लगतच्या चांद नदी पात्रातील बंधाऱ्यात एक मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.
सदर मृतदेह पानवन ता.माण येथील युवकांचा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत घटनास्थळ व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती अशी, काल सोमवार सकाळी येथील शिंदेवाडी रस्त्यावरील अजिंक्य दूध संघालगतच्या नदीपात्रात हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन हिंमतपोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी व पोलीस पाटील प्रशांत कोळी यांना दिल्याने तातडीने ते याठिकाणी पोहचले. प्रथमदर्शनी मृत व्यक्तीच्या शरीराचे पाण्यातील माशांनी लचके तोडल्याने ओळख पटवणे मुश्कील बनले होते.
घटनास्थळी सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी भागातील एखादी व्यक्ती गायब आहे का? याची माहिती घेतली असता माण तालुक्यातील पानवन येथील एक व्यक्ती गायब असल्याची तक्रार संबंधित कुटुंबातील व्यक्तींनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्याचे समोर आले. या कुटुंबियांना हा मृतदेह ओळखीसाठी बोलावले. त्यांनी खातरजमा केली असता .या मृत युवकाची ओळख पटली.सदर मृत व्यक्तीचे नाव लहुजी लक्ष्मण तुपे (वय-२२) असून हा युवक माण तालुक्यातील पानवन या गावातील रहीवाशी असून त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. असे तापसांअंती निष्पन्न झाले. मृत युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मायणी पोलीस दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.
आज सर्वत्र पाडवा व भाऊबीजची गडबड चालू असताना शुभ सणाच्या मंगल प्रसंगी ही अमंगल घटना आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.
0 Comments