Ticker

6/recent/ticker-posts

रेमडेसिविरचे धागेदोरे सातारा, कराडकडे



सातारा, तारळेतील दोघे अटकेत, कराडातील नामांकित मेडिकलची तपासणी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण:

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या चौघांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली असून या प्रकरणाचे धागेदोरे सातारा, तारळेमार्गे कराडपर्यंत पोचल्याचे खात्रीशीर वृत्त असून कराडातील मोठ्या नामांंकित हॉस्पिटलच्या मेडिकलची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, याप्रकरणी फलटणमधील एका मेडिकल दुकानदाराचे व त्याच्या भावाचेही नाव समोर येत असून याप्रकरणी आणखी कोण कोण गळाला लागणार याकडे लक्ष आहे.  

दोघांना अटक

येथील सुविधा हॉस्पिटलमधील वार्ड बॉयसह अन्य तिघा जणांना रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करत असल्याप्रकरणी अटक केल्यानंतर चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी संबंधीत सातारा जिल्ह्यातील आणखी दोघांना औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने अटक करण्यात फलटण शहर पोलीसांना यश आले आहे. नव्याने अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मेडिकल दुकानदाराचे व त्याच्या भावाचे नाव पुढे आले असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात मेडिकल दुकानदाराचे नाव पुढे येत असल्याने येत्या काळात तालुक्यातील रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करताना आता हॉस्पिटलसह मेडिकल दुकानदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.

याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सांगितले की, दिनांक 9 रोजी फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटल मधील वार्ड बॉय सुनील विजय कचरे हा 35 हजार रुपये किमतीने रेमडेसिवर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून सुनील कचरे व त्याच्या बरोबर असणारा अजय सुरेश फडतरे या दोघांना पकडले होते. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून प्रवीण मिस्त्री उर्फ प्रवीण दिलीप सापते रा. घाडगेवाडी (ता. फलटण) व निखील घाडगे यांना अटक केली होती. या चौघांकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यामध्ये सातारा शहरातील अमित विजय कुलकर्णी याने सदरचे रेमडीसीवर इंजेक्शन तारळे, ता.पाटण येथील रविंद्र रामचंद्र लाहोटी याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्याने या दोघांना अटक केली आहे.

 अमित कुलकर्णी व रविंद्र लाहोटी यांच्याकडून चौकशीमध्ये एका मेडिकल वाल्याचे व त्याच्या भावाचे नाव पुढे आले असून  शहर पोलीस पुढील तपास करत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजार करणार्‍यांविरोधात कुणाला तक्रार करायची असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही  भारत किंद्रे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments