Ticker

6/recent/ticker-posts

Self Diagnosis करू नका.



कोरोना आज सर्व जगापुढे आव्हान बनून राहिला आहे. सर्व जग भीतीच्या छायेत जगत आहे. भारतात पण या आजाराने उच्छाद मांडला आहे. अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. आजही अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, तर काही जास्त त्रास नसलेले mild आणि moderate प्रकारात मोडणारे अनेक रुग्ण घरच्या घरी स्वतःला Home Isolate करून घेताहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर साधारण १०- १५ दिवसांत परिस्थिती सुधारेल असे वाटले होते, परंतु असे काही होताना दिसत नाही.
या दुसऱ्या लाटेचा तडाखा एवढा भयंकर आहे की एकेका गावात १००-१५० रुग्ण सापडत आहेत. कितीही आरोग्य सुविधा निर्माण केल्या तरी त्या कमीच पडत आहेत. या लाटेचा तरुण पिढीला खूपच मोठा फटका बसला आहे. अनेक गावांनी स्वतःहून गावबंदी, संचारबंदी केली आहे. गावं ओस पडली आहेत. रस्ते ओस पडले आहेत. गावातून फिरताना इतकी भयाण शांतता यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. शोले चित्रपटात डाकू गब्बरसिंगच्या भीतीने गाववाले दारं बंद करून घरात बसल्यानंतर गावात जी स्मशान शांतता पसरते, तशी भीतीदायक शांतता आज अनुभवयास मिळत आहे.
एवढ्या उपाययोजना करूनही नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांचा वेग काळजीत टाकणारा आहे. गेल्यावर्षापासून आपण कोरोनाशी संघर्ष करतोय. कोरोनाबाबत जनजागृती सुद्धा चांगली झाली आहे. शक्यतो लोकं घराबाहेर पडत नाहीत. पण  तरीही रुग्ण संख्या का वाढते याचा शोध घ्यावा लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की अनेक नागरिक आजारी असूनही भीतीपोटी टेस्ट करून घेत नाहीत. औषधोपचार करत नाहीत. दुखणे अंगावर काढतात. एकतर उपचारासाठी लगेच येत नाहीत आणि आले तर होणाऱ्या त्रासाबाबत नीट माहिती देत नाहीत. Self Diagnosis  करत बसतात.
मी थंड पाणी पिले म्हणून मला सर्दी झाली. रानात खूप काम पडले, त्यामुळे कणकणी आलीय. तेलकट खाल्ले, त्यामुळे घसा दुखतोय. या दिवसांत मला नेहमी त्रास होतोच. प्रकारची काहीही कारणे देऊन भीतीपोटी वेळ मारून न्यायला बघतात. त्यांना समजत नाही की आत्ताची वेळ ही ते समजतात तशी नाही. अगोदर घरगुती उपचार करत बसतात. त्यात ३-४ दिवस जातात. कोरोनाच्या रुग्णाला सहावा दिवस खूप घातक असतो. त्रास सुरू झाल्यानंतर त्वरित उपचार घेतले नाहीत आणि तो कोरोना बाधित असेल, तर सहाव्या दिवसांपासून त्याचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. त्यामध्ये मग ऑक्सिजनची पातळी खालावणे, खोकला वाढणे, धाप लागणे, अंग दुखणे असे अनेक त्रास सुरू होतात. Moderate च्या दुसऱ्या टप्प्यात किंवा कोरोनाची तिसरी स्टेज serious या अवस्थेत तो गेला तर त्याला एडमिट करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हीयरची कमतरता या पार्श्वभूमीवर मग या प्रकारातील रुग्णांना recover करणे खूप अवघड होते. कधी कधी हे सगळं मिळूनही उपयोग होत नाही. अगोदर ३-४ दिवस घरी काढल्यामुळे घरातील इतर लोकं आणि त्यांच्या संपर्कात आलेली बाकीची लोकंही बाधित होतात. वेगाने रुग्ण संख्या वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. एखादा रुग्ण जर कोरोना बाधित झाला, तर त्या घरातील सर्व सदस्यांची टेस्ट करून त्यांना आयसोलेट करायला हवे. काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक आम्हाला काही त्रास होत नाही असे म्हणत खुशाल बाहेर फिरत बसतात. त्यामुळे आम्ही सत्य सह्याद्रीच्या टीमच्या वतीने सर्वांना विनंती करतो की कृपा करून कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. तुम्ही स्वतः निदान करू नका. तुम्हाला थोडा जरी त्रास सुरू झाला, तर सर्वप्रथम स्वतःला कुटुंबापासून अलग करा. आपल्या डॉक्टरांच्याकडून तपासणी करून घ्या. त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा. कोरोना प्राथमिक अवस्थेत असेल तर तुम्हाला एडमिट होण्याची  आवश्यकता भासत नाही. तुम्ही औषधे घेऊन स्वतःला Home Isolate करून १४ दिवसांत पूर्णपणे बरे होऊ शकता. ही अत्यंत महत्त्वाची बाब जर आपण लक्षात घेतली, तर वाढत्या रुग्ण संख्येला आपण निश्चितच आळा घालू शकतो. धन्यवाद
-किशोर बोराटे

Post a Comment

0 Comments