उधोजीराजे - (गंभीरपणे) अरे , कोणाला फोन लावायचा होता तुला ? चुकून मला लावलास वाटतं ! रात्रीची उतरली नाही ना, झोप डोळ्यांवरची, की होतं असं कधी कधी. ठेऊ का फोन ?
चुलतराजे - ( अडचणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत) कोणाला म्हणजे काय ? अहो, दिल्लीश्वरांचं प्रेमपत्र तुम्हालाच आलं आहे ना ? मग तुम्हालाच लावलाय फोन.
उधोजीराजे - ( मनातल्या गुदगुल्या लपवत ) आलंय खरं पत्र दिल्लीश्वरांचं , पण प्रेमपत्र नाहीये ते काही . प्रशस्तीपत्र आहे ते ! किंबहुना मी तर म्हणेन की , प्रेमाने ओथंबलेलं प्रशस्तीपत्र आहे ते ! आतापर्यंत दहा वेळा तरी वाचलं असेल मी ते.
चुलतराजे - ( टवाळीच्या सुरात ) म्हणजे 'संकेत मिलनाचा' की काय ?
उधोजीराजे - ( सावध होत) असलं प्रशस्तीपत्र मिळविण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. नुसतंच 'खळ्ळखट्ट्याक' करणाऱ्यांना नाही मिळत असली प्रशस्तीपत्र. जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग ?
चुलतराजे - ( मिश्कीलपणे ) नुसतं एका पत्राने इतकं हुरळून जाऊ नका. त्या दिल्लीश्वरांना रोज सकाळी मोरांना दाणे टाकण्याची सवयच आहे . एखाद्या दिवशी नसतील दिसले मोर ; तर टाकले असतील तुम्हाला पत्रातून दाणे ! मागे नाही का तुमच्या मोठ्या साहेबांना त्यांच्या गावी जाऊन दाणे टाकले होते ? एकदा तर थेट दाणे दाखवत अहमदाबादपर्यंत पळवलं होतं ! आणि तुम्हाला बंद खोलीत खमण-ढोकला, जिलेबी हादडत टाकलेले दाणे विसरलात की काय इतक्या लवकर ?
उधोजीराजे - (शांतपणे) चालायचंच . तू नव्हता का गेला होतास अहमदाबादला, त्यांची विकास कामं पाहायला ? आणि तू नव्हंत का दिलं त्यांना न मागता प्रशस्तीपत्र ?
चुलतराजे - (संतापून) अरे, फसवलं होतं त्यांनी मला. सगळीच बनवाबनवी होती ती. नंतर लक्षात आलं माझ्या ते. ते असू दे, पण एक दिवस एकहाती सत्ता मिळविन तेव्हा कळेल सगळ्यांनाच.
उधोजीराजे - ( टवाळीच्या सुरात ) एकहाती सत्ता ? ती कशी असते बुवा ? सध्या तर ' एकपायी सत्ता' मिळवायचे दिवस आहेत. आमच्या दीदींनी नाही का मिळविली तिकडे पश्चिम बंगालमध्ये , व्हीलचेअरवर बसून 'एकपायी सत्ता' !
चुलतराजे - ( संतापून) मला अशी नाटकं करणं नाही आवडत. सत्ता मिळविण्यासाठी कुठे हातपाय तोडून घ्यायचे ? माझी किंमत कळेल एक दिवस लोकांना. देतील मग एकहाती सत्ता मला.
उधोजीराजे - ( समजवणीच्यासुरात) हा जो तुझा स्वभाव आहे ना , त्याच्यामुळेच तू असा एकटा पडत चालला आहेस. सभेच्या ठिकाणी नुसतं तुला व्हिडीओ लावायला बोलवतात एखाद्या साउंड सर्व्हिसवाल्यासारखं , नंतर कोणी विचारत नाही तुला.
चुलतराजे -( संतापून) अरे, तीन रंगांच्या मेंढ्यांच्या कळपात वावरण्यापेक्षा मी जो एकटा पडलोय ना ते कितीतरी चांगलं आहे . आणि तू जे सभेत व्हिडीओ लावण्याबद्दल बोलतोय ना साफ चुकीचं आहे ते. अरे, दिल्लीश्वरांच्या विरुद्ध सभेत काय बोलावं हे सुचत नव्हतं कोणाला, म्हणून बोलवायचे मला ; बुद्धिमान म्हणून, जिगरबाज म्हणून. म्हणे साउंड सर्व्हिसवाला ! उद्या तुला कोणी वाघाचं कोकरू म्हटलं तर चालेल का ?
@ मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक, धुळे
संपर्क -७८७५० ७७७२८

0 Comments