Ticker

6/recent/ticker-posts

देऊर चोरीतील सोने वाईच्या व्यापार्‍याला विकले



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वाई:  कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे गेल्या महिन्यात चोरट्यांनी पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी  वाठार पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याने चोरीचे सोने वाईतील एका टग्या व्यापार्‍याला विकल्याची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे   नुकतेच वाठार पोलिस स्टेशनचे   पोलिस पथक  चौकशीसाठी   संबंधित व्यापार्‍याच्या दुकानात दाखल झाले होते. यामुळे  वाईच्या सराफी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, याआधी देखील  भुईंज पोलिसांनी  ‘त्या’ व्यापार्‍याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता देऊरच्या चोरीत   गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

14 जूनच्या मध्यरात्री देऊर येथील एका राहत्या घरातून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 90 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाठार पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोरीसह अन्य घरफोडीचा तपास करत असताना सराईत गुन्हेगार जकल्या काळे काही दिवसापूर्वी त्याच्या हाती लागला

चौकशीत त्याने वाईतील व्यापार्‍याला ते सोने विकले असल्याची कबुली दिली. 

वाठार पोलिसांनी त्याअनुषंगाने शुक्रवारी अचानक त्या व्यापार्‍यांच्या दुकानावरर धाड टाकली. सुमारे अर्धा तास पोलीस त्याच्याकडे  चौकशी करत होते.  त्याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही.

संबंधित व्यापार्‍याने यापूर्वीही अनेकदा चोरीचे सोने घेतल्यामुळे तो सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. आमदार, एसपी, कलेक्टर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस  निरिक्षक हे माझ्या खिशात असतात अशा ऐटीत वावरत असल्यान त्यावेळी त्याने राजकीय दबाव वापरून दोन गुन्ह्यातून आपली सुटका करून घेतली होती, अशी चर्चा  सराफ बाजार पेठेसह वाईत  सुरू होती. 

आता या प्रकरणात नेमके काय होणार याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे. वाठार पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments