वडूज:
जिल्हा बँक निवडणूकीसाठी खटाव तालुका वि.का.स.सेवा सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निमसोडचे युवा नेते नंदकुमार मोरे यांना देणे हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय असल्याचे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी जि.प.सदस्य प्रा. एन. एस. उर्फ बंडा गोडसे यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना प्रा. गोडसे यांनी सांगितले की, आजपर्यंत बँकेचे विद्यमान संचालक प्रभाकर घार्गे यांनी जिल्हा बँकेसाठी तीनवेळा खटाव तालुक्यातून प्रतिनिधीत्व केले आहे. यापैकी दोनवेळा त्यांना पक्षाच्या माध्यमातून बँकेवर बिनविरोध जाण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय पक्षाने त्यांना सहा वर्षाकरीता विधान परिषदेची आमदारकीही दिली होती. मागील निवडणूकीवेळी आपणासह नंदकुमार मोरेही इच्छुकांच्या शर्यतीत होते. त्यावेळी ऐवढी वेळ थांबा तुम्हाला भविष्यात संधी दिली जाईल असे वरिष्ठांनी आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने श्री. मोरे यांची बँकेला उमेदवारी आली आहे. सद्यस्थितीत श्री. घार्गे हे कलम 302 सारख्या गंभीर गन्ह्याच्या न्यायालयीन प्रकीयेत अडचणीत असल्या कारणाने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देणे संयुक्त ठरणार नाही. याबाबत खटाव तालुक्यातील पक्षाच्या मातब्बर पदाधिकार्यांनी वरिष्ठांना लेखी निवेदन दिले होते. याचा सारासार विचार करुन पक्षाने मोरे यांच्या उमेदवारी निश्चित केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या उमेदवारी संदर्भात दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच सुतोवाच्य केले आहे. तसेच पक्षाच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनीही आग्रही भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी औंध येथे प्रमुख पदाधिकारी व भागातील मतदारांच्या बैठका घेवून योग्य ते मार्गदर्शन केले आहे. पक्षाचे नेते निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिपआण्णा विधाते, जि.प.चे पक्षप्रतोद सुरेंद्रदादा गुदगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी सभापती संदिप मांडवे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी मोरे यांच्या उमेदवारीची पाठराखण करत आहेत. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पक्षाचे जिल्हा नेते आ. शशिकांत शिंदे व इतर नेतेमंडळींचे मोरे व इतर पदाधिकार्यांना मार्गदर्शन होत आहे. तरी घार्गे यांच्यावर अन्याय झाला असा प्रचार करुन कोणी वातावरण दुषीत करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 Comments