Ticker

6/recent/ticker-posts

हा देश कोणाचा?


देशाला परिचित एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात एकतर्फी 'घनघोर युद्ध 'पेटलं आहे.
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला क्रुझवर ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर अनेकांना हादरे बसले.किंगखान आणि त्याच्या साम्राज्याचा माज समीर वानखडे यांनी उतरविला.राज्याचे मंत्री आर्यनच्या अटकेचा निषेध करीत आहेत.हा' फर्जीवाडा'आहे,असा दावा होत आहे.एखाद्या चित्रपटाची पटकथा लिहावी,असे सगळे प्रसंग,मसालेदार ट्विस्ट सतत येत आहेत. राज्याची जनता मूर्ख असून आपण देऊ तो मसाला लोकं खपवून घेतात या नशेत असलेल्या माध्यमांनाही यावेळी विलक्षण ऊत आलायं.आर्यन खानच्या सुटकेसाठी तळमळणा-या देशभक्तांना जनता बघत आहे.
महाराष्ट्राची भूमी 'थिएटर' झाली की काय? अशी शंका यावी असे सर्वत्र वातावरण तयार केल्या जात आहे. एकीकडे सत्तेची मस्ती चालू असतांना दूर एका खेड्यात सेजलने आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या पत्राला वाचा, तुम्ही-आम्ही सगळेच सेजलचे गुन्हेगार आहोत.हा देश धर्मशाळा आहे. या देशात आता कोणाची भाषा चालत आहे? हा देश कुणाचा?शोध घ्यावा लागेल...इतकं पोखरत चाललयं सगळं!
मित्रहो,
तुमच्या-माझ्या मेंदुचा ताबा घेणा-या बातम्यांचा प्राध्यान्यक्रम नाईलाजाने मलाही विचारात घ्यावा लागत आहे.लोकांना काय आवडतं याचा विचार प्रत्येकाला करावा लागतो.सध्या जे काही चाललयं ,त्याकडे थोडं शांत होऊन बघा.कुठे चाललो आपण?
आजचा संवाद थोडा उद्विग्न आहे.दांभिकतेच्या सीमा पार केलेल्या घटनांवर बोलतांना लोकं शांत कशी आहेत,याचा विचार करायला लावणारा आहे.हा देश कोण चालवितो? असा प्रश्न विचारणारा आहे.
मनात अजून एक प्रश्न येतो.हा देश कोणाचा आहे? मंत्र्यांचा,राजकीय नेत्यांचा,किंगखानचा की सेजलचा!
थेट बोलायला सुरूवात करू.लोकांना सगळं थेट आवडतं.फक्त आवडतं,लोकं थेट वागत नाहीत.समीर वानखेडे या नावाला एक ग्लॅमर आलयं.कदाचित शाहरूख खान एवढं प्रसिद्धीचं वलय नसेल मात्र या नावात काही तरी वेगळेपण दडलयं!
राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती समीर खान यांनी ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत गुगल पे वरून वीस हजार रूपयाचा व्यवहार केला.सजनानीने असं सांगितलं की,समीर खानला आपण ड्रग्ज पुरविले.त्यानंतर 13जानेवारी 2021रोजी एनसीबीने समीर खानला अटक केली.या प्रकरणात समीर खान सहा महिने कारागृहात होता.सासरे राज्याचे कॅबिनेट मंत्री असतांना जावई जेलची हवा खात आहे,ही घटना सगळी सत्तेची नशा उतरविणारी आहे. त्यानंतर मौक्याच्या शोधात असलेल्या नवाब मलिकांना थेट किंगखानची 'आहत'कामी आली.आर्यनखानच्या मुद्द्यावरून नवाब मलिक रस्त्यावर उतरले. मलिकांचं एकाअर्थी बरोबर आहे,ते अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री आहेत.त्यांनी समीर वानखेडेंवर धारधार वाक्बाण चालविले.घटनाक्रम बघितला तर समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम इथंपासून त्यांची नियुक्तीच बोगस आहे इथंवर त्यांनी स्टोरी आणून सोडली आहे.
या सगळ्या घटनाक्रमांकडे तुम्ही कसं बघता?नवाब मलिक यांचा थयथयाट अनावश्यक आहे की, हर्बल वनस्पतीसारखा नैसर्गिक आहे?समीर वानखेडेंवर केलेले आरोप एका नियोजित श्रृंखलेचा भाग आहे.मंत्री मलिक म्हणाले, एका वर्षात समीर वानखेडेंना जेलमध्ये पाठवितो.
समीर वानखेडे या भारतीय अधिका-यावर आपण बोललो पाहिजे.त्यांनी अमली पदार्थाच्या गैरव्यवहाराविरूद्ध उभारलेल्या आघाडीचं कौतुक केलं पाहिजे.या ओळींपलिकडे आता मला पुढचे वाक्य लिहायला संकोच होतो आहे.कुठेतरी अवघडल्या सारखं होते आहे.तुमच्या-माझ्या मनात समीर वानखेडेंबद्दल शंका निर्माण झाली आहे. वानखेडे खरचं 'खंडणी ' साठी हा सगळा कारवाईचा बनाव करीत असतील काय?
मनात शंका येत आहे.खरं बोललं पाहिजे.अगदी हेच नवाब मलिकांना या आरोपांच्या 'झडी'तून साधायचे होते.त्यांना ते जमलं.आता बघु,कोण उभं राहतं, समीर वानखेडेंच्या पाठीशी!!
मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या अंतर्गत मामल्यातून थोडं बाहेर या.शांतपणे विचार करा.नवाब असे बोलले-तसे म्हणाले किंवा समीर वानखेंडेचा त्यावर असा खुलासा आला...तसे स्पष्टीकरण आले.यापेक्षाही तत्वांकडे लक्ष द्या.किती घसरत चाललो आहोत आपण...लक्षात येईल तुमच्या..
मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा,जातीदर्शक दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला.लगेच त्यांच्या पहिल्या विवाहाचे...नंतर दुस-या विवाहाचे..वडिलांचे,बहिणीचे सगळे खाजगी मजकूर भराभर व्हायरल झालेत.विचार करा.तुमचे-माझे खाजगी दस्तऐवज असे कोणी व्हायरल केले तर?....
मंत्री गोपनीयतेची शपथ घेतात.सर्वांशी न्यायाने वागेल असे सर्वांसमक्ष सांगतात.पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्र्याने एका सरकारी अधिका-यावर वैयक्तिक आरोप करावेत काय?खाजगी गोष्टी सार्वजनिक कराव्यात?सरकार मलिकांच्या पाठिशी आहे का?
सगळं कळण्यापलिकडे आहे.या राज्यातील जनता टाॅलीवूडची प्रेक्षक असल्यासारखे मंत्री वागत आहेत.त्यांच्या नजरेत एका अधिका-याची बदनामी,त्याला नेस्तनाबुत करणं आणि बदला घेणं असेल...मात्र या राज्यातील प्रत्येक नागरिकाचे मुलभूत हक्क आणि स्वातंत्र्यासाठी सरकार कटिबद्ध असावं की, त्यांचे चारित्र्यहनन करण्यात सरकारने रस दाखवावा?
समीर वानखेडेंचीआई झहीदा मुस्लिम होत्या आणि वडील हिंदू.नवाब मलिक यांच्या दाव्यानुसार समीरचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांनी लग्नानंतर मुस्लिम धर्म स्विकारला व त्यांनी त्यांचे नाव 'दाऊद' ठेवले.नंतर ते पुन्हा हिंदूधर्मात परतले.या धर्मांतरामध्ये मंत्री नवाब मलिक यांचा दावा आहे की, एकदा तुम्ही मुस्लिम धर्म स्विकारला की, तुमची मूळ जात गळून पडते.तुम्ही मुस्लिम होता.
राज्याच्या एका जबाबदार मंत्री महोदयांचा हा दावा आहे.त्यानंतर थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप आहे की,समीर यांचे पहिले लग्न डाॅ.शबाना कुरेशी यांच्याशी झाले होते.तेव्हा ते मुस्लीम होते.यावर समीर वानखेडे यांनी खुलासा केला की,2006 मध्ये माझं पहिलं लग्न झालं.2016 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट झाला.त्यानंतर 2017मध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत हिंदू पद्धतीने विवाह झाला.या सगळ्या मुद्दयांतून समीर वानखेडे यांची जात,धर्म या जगाला माहिती करून देण्याचा हेतू साध्य झाला.
आता समीर वानखेडेंकडे आपापल्या सोयीने बघायला लोक मोकळे आहेत.कोणी त्यांना अनुसुचित जातीचे ठरवा,कोणी हिंदू कोणी मुस्लीम, कोणी देशभक्त आणि कोणी भ्रष्ट!
ही सोय आहे, राजकारण्यांनी करून दिलेली!या देशाला पुन्हा-पुन्हा धर्म-जातीत वाटण्याची.या क्षणापर्यंत समीर वानखेडेंच्या धाडसी निर्णय आणि कारवाईचे भारतीय स्वागत करीत आहेत.लोकांना अधिका-यांची जात महत्वाची नसते.अधिका-यांच्या दोनच जाती आहे,एक भ्रष्ट आणि एक स्वच्छ!!
संवादाला किती घुमारे फुटले.इच्छा नसतांनाही मंत्रीमहोदयांच्या वक्तव्यांची दखल घ्यावी लागली.ड्रग्जचा दूरदूर संबंध नसलेल्या लोकांनाही आर्यनच्या अटकेबद्दल खुलासेवार माहिती माध्यमे पुरवित आहेत.मी माझं रक्तही आटवत आहे.इतकं हे महत्वाचं आहे का? एका उच्च प्रशासकीय पातळीवर अशा प्रश्नांना सोडविता येणार नाही का? देशाच्या करोडो लोकांच्या ऊर्जेला एका वैयक्तिक प्रकरणात का गुंतवून पाडायचं आहे? हा गुंता जाणीवपूर्वक कोण तयार करीत आहे.थांबलं पाहिजे कुठेतरी!
मुंबईच्या क्रुझवरून सुरू झालेल्या या गदारोळात सरकारचे चाणक्य दररोज 'भाष्य 'करीत आहेत.कोण्या फितूर साक्षीदाराला संरक्षण मिळालेच पाहिजे,अशी सरकारला मागणी वजा आदेश होत आहे.
या गर्तेत एका बातमीने माझ्या डोळ्यांत अश्रू साठवलेत.मन निराश झालयं.शब्द थांबले आहेत.कुठेतरी आपण या समाजाचे गुन्हेगार आहोत या भावनेने हतबल झालोयं.त्या ह्दयद्रावक घटनेचा एकदा वेध घेऊया...मग जड अंतःकरणाने ऐकमेकांचा निरोप घेता येईल....!
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील छिंदवाडी या गावातील सतरावर्षीय सेजल गोपाल जाधव या युवतीने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.मृत्यूपूर्वी तुमच्या-माझ्या बधीर ह्दयाला डंख मारणारी एक चिठ्ठी तिने लिहिली.सेजल लिहिते, 'मी सेजल गोपाल जाधव आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण राहतो. फक्त माझी आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्ज आहे. आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे. माझा भाऊ लहान आहे. माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते. माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी येतेय. माझे बाबा खूप काम करतात. मी इयत्ता बारावीमध्ये आहे पण अॅडमिशन फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. मी खूप दिवसांपासून तणावाखाली आहे. आर्थिक परिस्थितीला कंटाळून मी स्वतःहून आत्महत्या करते आहे', माझे आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम करते. मला कॉलेजमध्ये काही विषय समजत नव्हते. कॉलेजला जाण्यासाठी युनिफॉर्मही नाही. माझ्या बहिणीने माझ्यासाठी शाळा सोडली. ती कामाला जाते. या सगळ्यांमुळे मी तणावाखाली आहे आणि नापास होण्याचीही भीती वाटत असल्याने मी माझे जीवन संपवत आहे.
या चिठ्ठीवर काय बोलता येईल? काय लिहू? एकीकडे लोक क्रुझ विकत घेण्याचा माज दाखवितात.सरकार विकत घेतात.सेजलला कोणीच का आपले वाटले नाही?सेजलने काही लिहायला ठेवले नाही.तिने रक्ताच्या शाईने या राज्याची परिस्थिती लिहिली आहे.आपल्या मातीतल्या सेजलचा आपण विचार करणार आहोत की, क्रुझवर नशेत धुंद आर्यनचा?हा देश कुणाचा?
लेखक:माधव पांडे
9823023003


Post a Comment

1 Comments

  1. कोणताही नेता असो कोणत्याही पक्षामध्ये असो सविधाना पेक्षा किंवा कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही म्हणून सर्व समाज बांधवांनी आपले पारदर्शक काम करावे आणि आपल्या देशाची प्रगती करावी

    ReplyDelete