वाठार स्टेशन:
येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला करून पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आज पहाटे झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राजेंद्र ऊर्फ राजाराम भिसे (वय ३५, रा. रविवार पेठ, वाई) व पूजा अजय भिसे (वय २५) यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. २९ सप्टेंबरला रात्री अजय व त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये भांडण झाल्याने पूजा ही गुरुवारी पुणे येथे निघून गेली. त्यानंतर माहेरी वाठार स्टेशन येथे वडिलांना भांडण झाल्याचे सांगितल्यावर पूजाची बहीण सुजाता घोलप व तिची आई रंजना दोरके या दोघी पूजाला वाठार स्टेशन येथे आणण्यासाठी पुणे येथे गेल्या. पुणे येथून काल साडेचार वाजता वाठार स्टेशन येथे आल्या.ती अजय भिसे याला आपली पत्नी वाठार येथे माहेरी आल्याचे समजल्यानंतर तो काल रात्री एक वाजता सासरी वाठार स्टेशन येथे आला. दरम्यानच्या काळात कौटुंबिक वादाविषयी चर्चा होत असताना पहाटे पाचच्या सुमारास अजयने किचनमध्ये असलेली कुऱ्हाड हातात घेऊन कॉटवर झोपलेल्या पत्नीच्या तोंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यानंतर तिथून पलायन करून पहाटे सहा वाजता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आत्महत्या केली.
पूजा हिला सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
0 Comments