Ticker

6/recent/ticker-posts

त्यांनी मतीही भंगारात विकलीय, नवाब मलिकांवर पडळकरांची टीका

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मुंबई
 

 भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “नवाब मलिक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहे” असा घणाघात पडळकर यांनी केला. मुंबई-गोवा क्रूझ पार्टीवर धाड टाकून NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना अटक केली. मात्र ही रेड पूर्णपणे बनावट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. यावरुनच गोपीचंद पडळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला.

पडळकर म्हणाले, “त्या क्रूजवर तेराशे लोकं प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते. आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला, त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली. उर्वरीत लोकांना एनसीबीने सोडलेले आहे. मुळात तुमचं वसुली सरकार हे वसुलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागतेय”.

तुमच्या स्वत:च्या जावायाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना, तुम्ही तेव्हा कशासाठी गप्प बसले होता? नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे? असे सवाल पडळकरांनी उपस्थित केले.

असे तर नाही ना की NCB ने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत ? या भीतीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना ? अशी शंका पडळकर यांनी व्यक्त केली.
नवाब मलिक काय म्हणाले होते?

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई-गोवा क्रूझ पार्टीप्रकरणी हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. 1300 लोकांच्या जहाजावर 11 जणांनाच ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

Post a Comment

0 Comments