सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: माण तालुक्यात पुन्हा एकदा बेसुमार वाळू उपसा सुरु झाला असून महसूल प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. वाकी येथे माफियांनी अक्षरश: माणगंगा नदी पोखरली असून तेथे किमान दहा ते पंधरा फूट खोल खड्डे पडले आहेत. आता प्रशासन खरंच माफियांच्या मुसक्या आवळणार की थातुरमातूर पंचनामा करून पळ काढणार याकडे माणवासियांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील वाकी येथील नदीपात्रात गावातीलच व तालुक्यातील काही दिग्गज वाळू चोर रात्रभर गावातील काही टग्यांना हाताशी धरून व महसूल प्रशासनाच्या संगनमताने राजरोसपणे वाळूचोरी करत आहेत.
भोसले वस्ती जवळ माणगंगा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. सदर ठिकाणी ट्रॅक्टर डंपर, जेसीबी च्या साह्याने रात्रभर वाळू उपसा होत आहे. अवैध वाळू उपसा सुरु असताना माण तालुक्यातील महसूल विभाग निवांत झोपला असून त्यांना याचा विसर पडला आहे की माफियांशी त्यांचे काही अर्थपूर्ण संबंध आहेत, याबाबत चर्चा सुरु आहे.
काही दिवसापूर्वी वाकी वरकुटे यात भल्या पहाटे अवैध वाळू उपशावर धाड टाकण्यात आली होती. मात्र, यामध्ये वाळू चोर आपल्या दोन जेसीबी सह पळून गेले.
तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी वाळू चोरांची माहिती घेतली असता सदरच्या जेसीबी मालकाची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उचलत एका जेसीबीला साडेसात लाखाचा दंड केला असल्याची नोटीस बजावत नोटीस पोचताच 24 तासात सक्षम हजर राहून खुलासा करण्याचे फर्मान काढले. तहसिलदारांनी काढलेली नोटीस संबंधिताला बजावण्याचे काम गाव कामगार तलाठी साहेबांकडे दिले. त्यांनी 12 नोव्हेंबरला काढलेली नोटीस 19 नोव्हेंबरला संबंधिताकडे अखेर पोचवली.
24 नोव्हेंबर चा पाचवा दिवस उलटून गेला तरी तो जेसीबी मालक तहसीलदारां पुढे हजर झाला नाही मात्र नोटीस मिळताच 24 तासात हजर करण्याचे आदेश आपणच काढला होता हे मात्र तहसीलदार विसरून गेले. त्यामुळे अनेकदा अशा कारवाया कागदोपत्रीच रहात असून त्यात सेटलमेंट होत असल्याची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, वाकी येथे वाळू उपसा होत असल्याबद्दल तेथील सरपंचांना प्रतिक्रिया विचारली असता आपण येथे येऊन पाहावे व माहिती घ्यावी, अशी प्रतिक्रिया दिली. तहसीलदार सूर्यकांत येवले प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
केवळ वाकीच नव्हे तर तालुक्यातील माणगंगेचे संपूर्ण पात्र वाळूमाफियांनी पोखरून टाकले असून दररोज असंख्य डंपर तालुक्यातून तालुक्याबाहेर धावत असतात. या अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. या वाहतुकीविरोधात कोणी बोलले तर त्याला दम दिला जातो किंवा पैसे देऊन मिटवामिटवी केली जाते.
संपूर्ण प्रशासन पाठिशी असल्याने या माफियांचे फावले असून याप्रकरणी तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवत नाही, ही विशेष बाब आहे.
आता याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी स्वत: छापे मारून वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यातील काही जागरुक नागरिकांनी याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे ‘सत्य सह्याद्री’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आता लक्ष आहे. ते प्रशासनाच्या कारवाईकडे.
सत्य सह्याद्रीचे आहे लक्ष
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरु झाला आहे. याबाबत सत्य सह्याद्री कार्यालयाकडे थेट तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रशासन व माफियांचे साटेलोटे असल्याने या माफियांवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीच आता लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू उपसा होत असल्यास नागरिकांनी थेट सत्य सह्याद्री कार्यालयात छायाचित्रे, व्हीडिओ माहिती पाठवावी वाळू उपशाच्या वृत्तांना सचित्र प्रसिद्धी दिली जाईल, असे आवाहन करण्यात येत आहे. आपली माहिती satyasahyadry@gmail.com या मेलआयडीवर अथवा 8983243040 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल
-संपादक, दैनिक सत्य सह्याद्री
0 Comments