Ticker

6/recent/ticker-posts

वाळू माफियांमध्ये खळबळ ‘सत्य सह्याद्री’च्या वृत्तानंतर फोनाफोनी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा :
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच माण तालुक्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली. ‘सत्य सह्याद्री’च्या बातमीनंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फोनाफोनी सुरु होती.
तालुक्यात माणगंगा नदीतून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे वाळू उपसा सुरु आहे. आर्थिक साटेलोटे असल्याने या वाळूचोरीला कोणाचाच अटकाव नाही. गावपातळीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठी साखळी असल्याची चर्चाही यानिमित्ताने तालुक्यात झडत आहे.
विशेषत: नदीकाठच्या गावचे नव्याने झालेले पोलीस पाटील ते तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही साखळी असल्याचे बोलले जात असून प्रशासनाने अशी साखळी नाही, हे दाखवून देण्यासाठी कारवाईचा धडाका उठवून देण्याची गरज आहे.

कारवाई छटाकभर, प्रसिद्धी किलोभर

वाळू चोरीच्या बातम्या आल्यानंतर किंवा तक्रारी झाल्यानंतर तालुक्यात वाळू चोरीवर अनेकदा किरकोळ कारवाई केली जाते. त्यामध्ये वाळू केवळ पाच ते दहा ब्रासच असते. मात्र, जेसीबी, डंपरची मोठी किंमत दाखवून मोठी कारवाई केल्याचे भासवले जाते. त्यातही जप्त केले जाणारे अनेक डंपर, ट्रॅक्टर हे कालमर्यादा संपलेले असतात. त्यामुळे संबंधित मालकाला अशी वाहने जप्त झाली तरी काही फरक पडत नाही, अशीही माहिती काही सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

बातम्या आल्याकी हप्ता वाढतो

वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या की माफियांना दोन चार दिवस वाळू ओढू नका, अशी तंबी दिली जाते. शिवाय आता पेपरला बातम्या आल्यामुळे हप्ता वाढवून मागितला जात असल्याचेही काही माहितगार सूत्रांनी सांगितले.. त्यामुळे थातुरमातूर कारवाई होऊन हप्ता वाढत असल्याने वाळू माफिया पुढे वाळूचे दर वाढवित आहेत. त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण ग्राहकांवरच पडत आहे.
वास्तविक वाळू बंदी असल्यामुळे यातील पाच टक्के महसूलही शासनाकडे जमा होत नाही. वाळूच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत असून खाबूगिरी बोकाळली असल्याचा आरोप सामान्य नागरिकांमधून होत आहे. त्यामुळेच वाळू उपसा करणारे शिरजोर होत आहेत.

‘सत्य सह्याद्री’वर अभिनंदनाचा वर्षाव

वाळू चोरीचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेकांनी ‘सत्य सह्याद्री’ कार्यालयात दूरध्वनी करून अभिनंदन केले तसेच तालुक्यातील वाळू चोरीची तड लावून वाळू उपसा थांबवण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. दरम्यान, वाळूअभावी बांधकामे ठप्प असल्याने रितसर वाळूला परवानगी मिळावी, यासाठीही ‘सत्य सह्याद्री’ने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments