Ticker

6/recent/ticker-posts

‘पोलीस-महसूल’चा बोटचेपेणा की आर्थिक साटेलोटे?माण तालुक्यात वाळू तस्कर जोमात, आता हवा कारवाईचा धडाका

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: 
माण तालुक्यात माणगंगा नदीत वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या कडून कोट्यवधी रुपयांच्या वाळूची चोरी होत आहे. याला महसूल व पोलीस यंत्रणेमधील काही झारीतील शुक्राचार्यच जबाबदार असल्याची चर्चा आहे. महसूल विभाग व पोलिसांच्या बोटचेपेपणामुळे तस्करांचे फावले असून प्रशासन कोमात तर तस्कर जोमात असून खरच हा बोटचेपेणा आहे की मोठे आथिर्धक साटेलोटे आहे, याची चर्चा तालुक्यात झडू लागली आहे. दरम्यान, तालुक्याच्या पुर्व भागातील अनेक गुन्हे दाखल असलेला एक तलाठीच वाळू तस्करांचा म्होरक्या बनल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.  
माणच्या पुर्व भागात वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर, जेसीबी , ट्रक व डंपर साहाय्याने वाळू उपसा सुरू आहे. सर्व यंत्रणा मॅनेज करून जेसीबीच्या सहाय्याने धुमधडाक्यात वाळू उपसा सुरू असून यातून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरीला जात असली तरी महसूल व पोलीस यंत्रणा का मूग गिळून गप्प आहे  असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. या परिसरात माणगंगा नदीची अक्षरशः चाळण झाली असून दहा - पंधरा फूट खोली पर्यंत खड्डे पडले आहेत. तसेच त्यामुळे नदीकाठच्या विहिरींना धोका निर्माण झाला आहे.  स्वतः ला राजकारणी समजणार्‍या व्हाईट कॉलर वाल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे व  ज्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल असणारे यात सामील आहेत.
 येथील वाळू तस्करांनी जणू यंत्रणा विकत घेतल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली असुन काही वेळा कारवाई करण्यासाठी येणार्‍या कोतवाल, तलाठी, मंडलाधिकारी यांच्या वर हल्ले होण्या बरोबरच वाहने अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध म्हसवड व दहिवडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.  एकंदरीत या वरून येथील तस्करी किती बोकाळली आहे हे स्पष्ट होते.
या वाळूच्या पैशातुन तरूणाई गुंडगिरी कडे ओळताना दिसत आहे. येथे अंतर्गत धुसफूस  चव्हाट्यावर आली असून एकमेकांची महसूल विभागाला टिप देण्यावरून काही वेळा भांडणेही झाली आहेत. खालून वरपर्यत सर्व यंत्रणा मॅनेज करून हे वाळू तस्कर  जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर वाळू पोचवत आहेत.
त्यामुळे जणु अधिकार्‍यांनी माणगंगेचा लिलाव केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाळू तस्करांकडून मलिदा कोणा-कोणाला मिळतो ? असे अनेक प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत .

‘सूर्य’प्रकाशामुळे तस्करीला बाळसे

माण तालुक्यात तत्कालीन प्रांत मिनाज मुल्ला, प्रांत दादासाहेब कांबळे, प्रांत अश्‍विनी जिरंगे,तहसीलदार सुरेखा माने, तहसीलदार बाई माने यांनी आपल्या कारकिर्दीत कोणाचाही मुलाहिजा न ठेवता शेकडो वाहने पकडली होती. तशा महसूल दप्तरी नोंदी आहेत त्यामुळे हा धंदा अंधारात गेला होता पंरतु महसूल विभागातूनच पडलेल्या लख्ख ‘सूर्य’प्रकाशामुळे हा अवैध धंदा पुन्हा बाळसे धरू लागला असल्याची चर्चा आहे.

 पूर्व भागातील जनतेत असंतोषाचे ढोल !

माण तालुक्यात एक भानगडबाज महसूल कर्मचार्‍याने मोठा विरोध असतानाही  वाळूचे आगार असलेला सजा मिळवला असून त्याबरोबर अजून एक-दोन गावाचे सजेही लाभले आहेत. तो या गावातुन मंथली गोळा करत असल्याने व त्याच्या कामात मोठे गैरप्रकार असल्याने तसेच यापूर्वी अनेक गावांनी ग्रामसभेत बदलीचे ठराव घेऊन प्रशासनाला दिले होते तरीही त्या कर्मचार्‍याची अशा ठिकाणी बदली केली असुन त्यामुळे जनतेत असंतोषाचे मोठ्या प्रमाणात ‘ढोल’ वाजत आहेत.

अनधिकृत चालकच करतोय वसुली!

महसूल मधील एक कर्मचारी चालक नसतानाही महसुलच्या एका बड्या अधिकार्‍यांचे सरकारी वाहन चालवण्याचे काम करत असून तोच त्या अधिकार्‍याच्या नावे ट्रक व डंपरचे 40 हजार व ट्रॅक्टरचे 25 हजार मंथली गोळा करत आहे, अशी माहिती काही माहितगार सुत्रांनी दिली. त्याची चौकशी होण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी साहेब कॉल डिटेल्स काढाच!

जर एखाद्या सजग नागरिकांने महसुलच्या अधिकार्‍यांना वाळु उपशाबाबत फोन करून तक्रार केल्यास तक्रारदारांचा मोबाईल नंबर अधिकारी वाळू तस्करांना देत असुन यातून वाळू तस्कर व अधिकार्‍यांचे लागेबंधे उघड होत असून अशा महसूलच्या अधिकार्‍यांचे जिल्हाधिकारी यांनी कॉल डिटेल्स काढण्याची, तसेच माणगंगेची स्वतः पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments