सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाळू उपशात अनेक राजकीय पुढारीच म्होरके असल्याची माहिती असंख्य नागरिकांनी ‘सत्य सह्याद्री’ कार्यालयाकडे कळवली आहे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून तालुका पातळीवरील बहुतांशी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांंचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळे या विषयावर प्रशासनाबरोबर गावोगावचे स्थानिक ग्रामस्थ हतबल झाले आहेत. आता प्रशासन मुलाहिजा न बाळगता या राजकीय पुढारी असलेल्या वाळू माफियांचे बुरखे फाडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दक्षिण-पूर्व भागातही माणगंगेची चाळण
माण तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील वरकुटे - मलवडी , पुळकोटी, जांभूळणी , देवापूर , पळसावडे , शिरताव , कुरणेवाडी , महाबळेश्वरवाडी, काळचौंडी , शेनवडी या टोकाच्या गावापर्यंत अवैध वाळू व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. येथील ओढ्याच्या पात्रातून अवैधरित्या चोरटी वाळू वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याची माहिती असूनही माणच्या महसूल विभागाला व म्हसवड पोलीस जाग कशी येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभाग व म्हसवड पोलीस करतात तरी काय? वाळू चोरट्यांना नक्की अभय कोणाचे असे एक नाही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या गावांकडे कारवाई साठी का टाळाटाळ केली जाते असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
कारवाईची माहिती वाळू माफियांना अगोदरच कळते हा अनेकवेळचा अनुभव आहे. खात्यांगर्तच अधिकार्यांंच्या हाताशी धरून हा प्रकार घडतोय का ? अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. प्रत्येक गावात चार ते पाच ट्रँक्टर , पिकउप , छोटा हत्ती व झेग्नाँन अशी वाहने घेऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या गावात वाळू उपसा होत असल्याची रोजच्या रोज खबर्याद्वारे माहिती घेतली जाते. महसूल व पोलीस खात्याशी अर्थपूर्ण व्यवहार केलेला आहे. त्याला मंथली असे गोंडस नाव दिले आहे. प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेला ती मंथली जमा करायची असे ठरलेले आहे. अशी चर्चा येथील वाळू माफियाच वारंवार करीत आहेत. महसूल व पोलीसांचे हात ओले करून नैसर्गिक हानी करणार्या वाळू माफियांवर कारवाई होणे आवश्यक असताना सुध्दा महसूल आणि पोलिसांनी मौन का पाळले ? याची चर्चा सुरू आहे. या वाळू माफियांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माणच्या महसूल विभागातील वाझे कोण?
राज्यात महाविकास आघाडी सरकावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाले. तसेच आरोप आता माणच्या प्रशासनावर होत असून वाळू उपशाची मलई गोळा करणारा सचिन वाझे अनेकांना माहिती असूनही त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने नदीकाठच्या शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
धमक्या द्यायलाही अन् मिटवायलाही हेच पुढे
माण तालुक्यातील वाळू व्यवसायात अनेक राजकीय पुढार्यांचा सहभाग सर्वश्रूत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एखाद्याने तक्रार केली की काहीजणांना पुढे करून तक्रारदारांना धमक्या दिल्या जातात. त्या पाठीमागे यांचेच हात असल्याचे आरोप होत असून पुन्हा मिटवामिटवी करून मी कशी मदत केली, असे तक्रारदाराला भासवण्यासाठी हेच पुढारी पुढे असतात. त्यामुळे यापुढार्यांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेला पेलावे लागणार आहे.
0 Comments