शिरतावच्या ओढ्यातील वाळूचे ठेवलेले ढिगारे.. आणि पडलेले खड्डे...
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: ‘सत्य सह्याद्री’मध्ये सुरु असलेल्या वाळू उपशाविरोधातील मालिकेनंतर माण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वाळूमाफियांसह अनेकांना ‘सत्य सह्याद्री’ची धडकी भरली आहे. त्यामुळे या बातम्या केव्हा थांबणार तसेच ‘सत्य सह्याद्री’चा बंदोबस्त कसा करता येईल याची व्यूहरचना आणि चाचपणी सुरु आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांमधून या लेखमालेचे कौतुक होत असून तालुक्यातील माणगंगेसह सर्वच ओढे, नाल्यांचे सद्यस्थितीतील पंचनामे होण्याची गरज आहे. दुसरीकडे तुम्ही आम्हाला सांगा मग, आम्ही कारवाई करु, असे प्रशासनाकडून ‘सत्य सह्याद्री’ला सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाला वाळू चोरीची माहिती देणार्या शेकडो नागरिकांचे प्रशासनाबद्दलचे अनुभव वाईट असून आता प्रशासनाने स्वत:हूनच धाडसत्र सुरु करण्याची मागणी होत आहे.
वाळू चोरीची वृत्तमालिका सुरु झाल्यापासून सत्य सह्याद्री कार्यालयाचा दूरध्वनीं गेल्या आठवड्याभरापासून खणखणत असून अनेक ठिकाणचे फोटो कार्यालयात मेलवर धडकत आहेत. मात्र, प्रशासनाला हे का दिसत नाही याबाबात मोठे प्रश्नचिन्ह आहे.
शिरतावच्या ओढ्यातून राजरोसपणे होते वाळू चोरी
वाळूचोरांनी शिरतावच्या ओढ्यातून राजरोसपणे वाळू चोरी करून ओढ्याचे पात्र हपसले आहे. शिरताव गावच्या लगतच ओढ्याचे पात्र आहे. मात्र वाळू चोरी करत असताना महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी यांना ही वाळू चोरी का दिसत नाही. या गावचे तलाठी नक्की असतात कुठे हा सवाल गावकर्यामधून निर्माण होत आहे. राजरोसपणे वाळूचोरी चालू असून देखील शिरतावच्या ओढ्यातून वाळू चोरी करणार्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र या ओढ्यातून रोज दहा ट्रॅक्टर पाच डंपर आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसली जाते. गावकर्यांनी अनेकदा सदर तलाठी यांना या वाळू चोरी बाबतची माहिती दिली आहे. ओढ्याच्या पात्रांमध्ये सहा फूट खड्डेदेखील पडले आहे. चाळणीच्या सहाय्याने चाळलेली वाळू देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लोखंडी चाळण सुद्धा त्याच ठिकाणी पडलेल्या असतात. तरी देखील याकडे कानाडोळा का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकर्यांचे नुकसान
वाळू चोर शेतकर्यांच्या शेतातून मार्ग काढत जातात. त्यामध्ये शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान देखील होत आहे. शेतकर्यांनी यांना जाब विचारला असता शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी देतात. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकर्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांनादेखील शिरतावच्या वाळूचोरी बद्दल माहिती देण्यात आली होती. कारवाई करतो असे त्यांनी सांगून देखील एक महिना उलटून गेला तरी अजून एकाही वाळूचोरावर कारवाई झालेले नाही. राजरोसपणे वाळू चोरी होत असून देखील. प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. वाळू चोर आणि प्रशासन यात आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना? असाच सवाल निर्माण होता आहे...
0 Comments