Ticker

6/recent/ticker-posts

म्हसवड यात्रा अखेर रद्द, लांबूनच मिळणार रथाचे दर्शन

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, प्रांतांच्या बैठकीत निर्णय, भाविकांचा हिरमोड
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले/म्हसवड: राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 
या बैठकीत यात्रेबाबात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार सूर्यकांत येवले, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.   
माण खटाव मधील यात्रा बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्देश सूचनाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या गावाबाहेरून सहभागी होऊ इच्छिणार्‍या गावाबाहेरून दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले 
गावाबाहेरून येणार्‍या वैयक्तिक भाविकांच्या लसीकरण कागदपत्र तपासणी आरोग्य विभागाने शिक्षण महसूल नगरपालिका व इतर विभागाच्या मदतीने करून पात्र व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करून पात्र व्यक्तींना रांगेने दर्शनासाठी सोडावे असे सर्वसंमतीने ठरले 
 कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून धार्मिक विधी संबंधित व्यक्ती देवस्थान ट्रस्टकडून करण्यास परवानगी देण्यात आली. रथमिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली असून रथ हा यात्रा पटांगणात स्थिर राहील त्यांच्याभोवती डबल बँरेकेटींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. 19 कोरोना च्या सर्व नियमांचे व शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सूचनांचे पालन करतील त्याच भाविकांना दर्शनास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही सामूहिक स्वरूपाची कृती करता येणार नाही, मंदिरातील श्रींची मूर्ती व रथावरील पवित्र वस्तू व रथाचे दर्शन बॅरेकेंटिंग च्या बाहेरून घेता येणार असून श्रींची मूर्ती पालखी रथ व सर्व इतर वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. 
 तात्पुरती दुकाने व मनोरंजनाची साधने फेरीवाले हातगाड्या यांना परवानगी नाकारण्यात आली असून वाहनांच्या पार्किंग वाहतूक व व्यवस्थापन पोलीस विभागाला आवश्यक ते निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

दिंड्या, सासनकाठ्यांना मनाई 
बाहेरगावाहून येणार्‍या दिंड्या पालख्या सासनकाठी इत्यादींना मनाई करण्यात आली असून ध्वनीफित वापराबाबत पोलिस विभागाने आवश्यक असे निर्बंध लावावे, मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, नगरपालिका स्तरावर मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यवाही करावी, आरोग्य विभागाने तपासणी लसीकरण इत्यादी तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या 10 टीम उपलब्ध कराव्यात त्यांना मदत करण्यासाठी पोलिस विभाग महसूल विभाग निहाय 2 अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, शिक्षण विभागाने 6 शिक्षक उपलब्ध करून द्यावे, नियंत्रण कक्षासाठी प्रत्येक शासकीय विभागाने एक पर्यवेक्षक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध करून द्यावा, नगरपालिकेने पोलीस विभागाच्या समन्वयाने आवश्यक ते बॅरेकेंटिंग दि. 3 च्या रात्री 8 पर्यंत करून घ्यावी आणि स्वच्छता पाणीपुरवठा आणि सुविधा पुरवाव्यात इतर सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागाच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडाव्या आदी सूचना देण्यात आल्या. 
प्रांताधिकारी राहणार दिवसभर 
उत्सवाच्या दिवशी पूर्णवेळ कार्यकारी दंडाधिकारी पमंदिर व यात्रा पटांगणात उपस्थित राहणार आहेत. एकंदरीतच यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

Post a Comment

0 Comments