सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातत्याने प्रसारमाध्यमातून येणार्या बातम्या, गावकर्यांकडून होणार्या तक्रारी याकडे प्रशासन ढुंकूनही पाहात नसल्याने माणमध्ये वाळूमाफियांची मस्ती चांगलीच वाढली आहे. आता तर कोरोनामुळे आलेल्या निर्बंधामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. कडाक्याची थंडी आणि रात्रीची संचारबंदी यामुळे रस्त्यावर चिटपाखरू नसल्याचा फायदा उठवत माणमधल्या वाळूवाल्यांची रात्रीची भिरकीट सुरु आहे. ही वाळूची तस्करी नेमकी थांबणार कधी असा माण तालुक्यातील सर्वसामान्य माणसाचा सवाल आहे.
काही गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अकराच्या सुमारास चोरटा वाळू उपसा तसेच वाळू वाहतूक सुरु होत असून पहाटे सहाला सारे उठण्याच्या वेळेपेर्यंत वाळू वाहतूक बंद ठेवली जात आहे. सध्या माणगंगा नदीला पाणी असल्याने काही ओढे तसेच पाणी नसलेल्या भागातील तसेच नदीलगतच्या भागातून वाळू काढली जात असून प्रशासनाला ही बाब माहित नाही, असे म्हणणे मोठे धाडसाचे ठरणार आहे.
माण मधील काही सरपंच व पोलिस पाटीलच वाळू चोरत असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे. एकंदरीतच माण मधील महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. वाळू चोर जोमात असून त्यांचे आणि प्रशासनाशी त्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे. वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही महसूलचे अधिकारी गप्प का? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आह.
आतापर्यंत कोणतीही कारवाई नाही वाळूचोरी सुरूच रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाळूचोरी राजरोसपणे सुरुच आहे तरीपण महसूलच्या अधिकार्यांना का दिसत नाही असा सवाल जनतेतून केला जात आहे.
आठवडाभर नाकाबंदी करा
महसूल आणि पोलीस प्रशासनाने मनात आणलं तर तालुक्यात अनेक वाळूचोर सापडू शकतात. मात्र, अनेक वाळूमाफिया महसूल कर्मचारी, अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याच मांडीला मांडी लावून बसत असल्याचा अनेक नागरिकांचा आरोप आहे. आता हा आरोप खोडून काढण्यासाठी प्रशासनानेच हिसका दाखवण्याची गरज आहे. अन्यथा प्रशासन कायम बदनाम होत राहणार हे नक्की आहे. शिवाय एखाद्या ग्रामस्थाने कोणत्याही प्रशासनाकडे तक्रारी केली की. लगेच वाळूवाल्याला प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांकडून फोन जातो. त्यामुळे तक्रार करणार्यालाच दमटाटी होते.
आता वरिष्ठ अधिकार्यांनीच याप्रकरणी लक्ष घालून केवळ आठवडाभर नाकाबंदी केली तर वाळूवाले अलगद हाती लागतील. यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीच लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी तालुक्यात जोर धरत आहे.वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून एक टीम नेमून कारवाईचा बडगा उडवावा अशी अपेक्षा शेतकर्यांकडून होत आहे. त्यावेळी वाळू चोर व अधिकार्यांना चाप बसेल असं स्थानिकांमधून बोलले जात आहे. महसूलच्या अधिकार्यांना स्वतःच्या पदाचा विसर पडला असून माण मधील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असताना कित्येक गावकामगार तलाठी वाळू चोरांनाच आपल्या गाडीत फिरवत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या वाळूचोरांना काही शेतकरीही सामील असून माणगंगा नदी पात्राच्या शेजारी चिटकून असलेल्या जमिनीचे मालक शेतकरी आपल्या जमिनीचा काही भाग वाळू चोरांच्या हाती देत आहेत, अशा शेतकर्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी तरच वाळू चोरांना चाप बसेल.
दुसरीकडे सत्य सह्याद्रीने यावर आवाज उठवल्यानंतर वाळूवाल्यांसह प्रशासनातही मोठी खळबळ उडाली होती. काही वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचार्यांच्या बैठका घेत काहीही करा पण वाळूचोरी तुर्तास थांबवा असे सांगितल्याचेही कानावर आले होते. मात्र, साधा एकही वाळूवाला महिनाभरात प्रशासनाच्या हाती लागला नाही. खरंच माणमध्ये वाळूचोरी होत नाही की काय? अशी शंका निर्माण होत असून मग नदीत पडलेले खड्डे आपोआप पडले की काय? असा प्रश्न निर्माण होत असून मग या खड्ड्यातील वाळू स्वत: नदीनेच गिळली की काय? असा उपरोधिक सवालही विचारला जात आहे.
0 Comments