Ticker

6/recent/ticker-posts

कोण होणार वडूजचा नगराध्यक्ष?

राजकीय पक्षांना आत्मपरिक्षण करण्याची गरज

विशेष प्रतिनिधी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वडूज: वडूज नगरपंचायतीच्या निकालाने प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असले तरी त्रिशंकू बलामुळे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजूला नगराध्यक्ष बनविण्यासाठी समान संधी असल्याची राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे.
निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार विजयी झाले. यामध्ये जयवंतराव पाटील, बनाजी पाटोळे, सोमनाथ जाधव,  रेखा अनिल माळी, ओंकार दिलीप चव्हाण, रेश्मा श्रीकांत बनसोडे यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांसह पक्षाच्या इतर पराभूत उमेदवारांच्या मतांची एकंदरीत बेरीज 3067 होत आहे. या सहाबरोबर विधानसभा निवडणूकीपासून प्रभाग क्र. 17 मधील अपक्ष उमेदवार सचिन माळी यांची आमदार जयकुमार गोरे यांच्याशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चांगलीच सलगी वाढली आहे. तर प्रभाग क्र. 2 मधील मनिषा रविंद्र काळे, प्रभाग क्र. 4 मधील मनोज कुंभार व अन्य दोन पक्ष नगरसेवक मायनॉरिटीच्या मुद्यावर भाजपा बरोबर जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपाच्या बाजूने नऊ मताची जुळणी होवू शकते.
दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीचे सुनील हिंदुराव गोडसे,  आरती श्रीकांत काळे, रोशना संजय गोडसे, स्वप्नाली गणेश गोडसे, शोभा तानाजी वायदंडे हे पाच उमेदवार निवडून आले आहेत. या पाच सह पक्षाने लढविलेल्या इतर पराभूत मतांची बेरीज 2484 होत आहे. राष्ट्रवादीने प्रभाग क्र. 4 मध्ये कुंभार तसेच प्रभाग क्र. 5 मध्ये वंचित आघाडीच्या बडेकर यांना जाहीर पाठींबा दिला होता. याशिवाय काँग्रेसचे अभय देशमुख व प्रभाग क्र. 3 मधील  राधिका गिरीश गोडसे हे दोन अपक्ष पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी समर्थकच आहेत. तसेच प्रभाग क्र. 2 मधील अपक्ष उमेदवार सौ. काळे यांचा प्रभाकर देशमुख यांनी उघड प्रचार केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचीही बेरीज काठावरच्या बहुमतापर्यंत जावू शकते. असे असले तरी श्री. देशमुख यांची दोरी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हातात असल्याने ते कोणत्या बाजूकडे झुकणार याबाबत शेवटपर्यंत औत्सुक्य राहणार आहे.
हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय काँग्रेसने एकूण 16 जागा लढविल्या. त्यापैकी केवळ पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. अन्य ठिकाणी पराभव झाला तरी प्रभाग क्र. 8, प्रभाग क्र. 3, प्रभाग क्र. 15 मध्ये या पक्षाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. प्रतिकुल परस्थिती असतानाही स्वतंत्र पॅनेल टाकून पक्षाने 2186 मते घेतली आहेत. त्यामुळे पक्षाचा जनाधार अद्यापही टिकून असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने मोजक्याच जागा लढवून 792 मतांची गोळाबेरीज जमविली आहे. पक्षाच्या प्रभाग क्र. 2 मधील  व 16 मधील निलम ज्ञानेश्‍वर काळे, प्रभाग क्र. 16 मधील महेश नारायण गोडसे या दोन उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेत प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान उभे केले. असे असले तरी प्रभाग क्र. 1 व 4 मधील सेनापतीचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. वंचित आघाडीने प्रभाग क्र. 5 मधील श्रीमती शोभा बडेकर यांची जागा 248 मतांनी जिंकून तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. रा.स.प.चे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी प्रभाग क्र. 5 व प्रभाग क्र. 11 मध्ये उमेदवार उभे करुन पक्षाचे अस्तित्व जाणवून दिले आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अपक्ष उमेदवार सौ. मेघा नीलेश गोडसे यांनी 297 मते घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. सौ. गोडसे यांच्यासह निवडून आलेले व पराभूत अश्या सर्व अपक्ष उमेदवारांना 2 हजारच्या आसपास मताचे दान मतदारांनी टाकल्याचे दिसत आहे.

दोन्ही बाजूंनी घुसमट तरीही टायगर जिंदा

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत प्रा. बंडा गोडसे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. मात्र पक्षांतर्गत घुसमटीला कंटाळून त्यांनी पक्षत्याग केला. मात्र भाजपानेही त्यांच्या सुनबाई  राधिका गोडसे यांना प्रभाग 3 मधून उमेदवारी न देता वळचणीला ताटकळत ठेवले. अश्या दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडलेल्या प्रा. गोडसे यांनी उघड कोणाचीही साथ नसताना सुनबाईचा अपक्ष एकहाती विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्यासह प्रभाग क्र. 2 मधील त्यांचे जेष्ठ मित्र  विश्‍वासराव काळे या दोघांनी ‘टायगर जिंदा है’ हे दाखवून दिले आहे. त्यामुळे दोन्हींकडून दुखावलेले हे जेष्ठ कोणती भूमिका घेणार यावर नगराध्यक्ष निवडणूकीचे भवितव्य राहणार असल्याची चर्चा आहे.

 आ
रक्षणानंतर पत्ते खुले

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीस अद्याप आठ ते 15 दिवसांचा कलावधी आहे. त्याअगोदर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडणार आहे. कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. नगराध्यक्ष आरक्षणानंतरच उमेदवार व त्यांचे समर्थक आपापले पत्ते खुले करण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments