फलटण: साखरवाडी, ता. फलटण येथील परिसरात प्रदूषणाचा टक्का वाढला नागरिक दमा खोकल्याच्या आजाराने त्रस्त साखरवाडी तालुका फलटण येथील सध्या उसाच्या हंगामा मुळे वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्या रस्त्यावर काजळी व बग्यास पसरत आहे. एकंदरीतच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असताना या धुळीमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दत्त शुगर साखर कारखान्याच्या बॉयलर मधून पांढरे काळे धूलिकण हवेमध्ये पसरत आहेत संपूर्ण परिसरात या धूलिकणांचे साम्राज्य माजले आहे घराघरात घराच्या छतावर गाड्यांचे टपावर दुकानात या कणांचा राक्षस आपले साम्राज्य पसरवत चालला आहे गरिकांच्या नाकातोंडात डोळ्यात अडकणार्या काळ्यापांढर्या काजळी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या सततच्या हवेमध्ये उडणार्या काजळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
नागरिकांना रस्त्या रस्त्यातून वाहने चालवताना डोळ्यांमध्ये अचानकपणे येणार्या काजळीचा मोठा धोका संभवतो आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही सामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होत असताना याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही या मुळे घराघरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून तेथील डॉक्टरांना रुग्णांना सेवा देताना नाकीनऊ येत आहे.
साखरवाडी ची लोकसंख्या विचारात घेता दवाखाने ही कमी पडू लागले आहेत त्यामुळे सध्या येथील डॉक्टर व मेडिकल दुकानांची या प्रदूषणामुळे चलती असल्याची चर्चा आहे परंतु सामान्य नागरिकांना शारीरिक व आर्थिक ताण सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही असे असताना प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
आधीच करोनाचा धोका त्यात गावांमध्ये वाढलेले प्रदूषण यामुळे येथील परिसरातील नागरिक शारीरिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालले असून या वाढत्या प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट होत चालला असून नागरिक मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. शिवाय येथील बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसत असून दुकाना दुकानातून धुळीचे साम्राज्य पसरले असून कारखान्याच्या बॉयलर मधून उडणार्या काळ्यापांढर्या धूलिकणांचे कापड व किराणा इ. दुकानातून हवेतून पडणार्या काजळीचा परिणाम त्यांच्या मालावर दिसून येत आहे त्यामुळे मालाची प्रत खराब होत असताना दुकानदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
रस्त्या-रस्त्यावर काजळी चे थरच्या थर साठले असून येणार्या जाणार्यांना वाहनामुळे याचा धुरळा बोलण्याच्या पलीकडला असून हे तर असेच राहिले तर भविष्यात नागरिकांना दत्त शुगर कारखान्याचा परिसर सोडून जावे लागणार यात शंकाच नाही. तरी याचा लवकरात लवकर बंदोबस्त प्रदूषण नियंत्रण विभागाने करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
नागरिकांवर दारे बंद करुन बसण्याची वेळ
साखरवाडी परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे रात्रंदिवस अक्षरशः लोकांना घराची दारे लावून बसावे लागत आहे शेतात काम करणार्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत त्यांचा संपूर्ण अवतारच बदलला जात असून मजूर वर्गाला काम करताना पिकावरील पडलेल्या काजळीचा मोठा धोका संभवत पिकावरील पडणार्या काजळी मुळे पिकांची वाढ खुंटली असून पिकांच्या पानांमधून होणारे प्रकाश संशोलनाचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे.
अधिकार्यांचे साटेलोटे
प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी साखरवाडी कारखान्याच्या प्रदूषणाकडे आर्थिक हितापोटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून साखरवाडीत जल व वायू प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढले असून प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकार्याच्या विरोधात कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.
0 Comments