सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज: ज्ञानोबा माऊली तुकाराम.. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल... चा जयघोष करीत श्री गणेश मंदिराला प्रदक्षिणा घालून येथे श्री सिध्दिविनायक रथोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे रथ मिरवणूक शहरातून न काढता मंदिराजवळच रथ भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
सोहळ्याचे यंदा 39 वे वर्ष होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, दुपारच्या सत्रात महिला पुरूष भजनी मंडळांचे भजन एवढेच धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. आज सकाळी श्री ज्ञानेश्वरी वाचनाची सांगता करण्यात आली. ह.भ.प. विजय महाराज शिंदे (लोणीकर) यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर ह.भ.प. जयवंत कुलकर्णी (भोसरे) यांचे गणेश जन्माचे किर्तन झाले. दुपारी सव्वाबारा वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला. श्री गणेश जन्माच्या किर्तनानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रथामध्ये श्रींची व श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवण्यात आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम.. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल... चा जयघोष करीत श्री गणेश मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात रथ ठेवण्यात आला. भाविकांनी रथावर रोख रक्कम तसेच नारळाचे तोरण अर्पण केले. नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्यावतीने पेढ्यांचे तर राऊत परिवाराच्यावतीने भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.
0 Comments