वडूज: येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष व भाजपा अश्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार मनिषा रविंद्र काळे व प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपच्या रेखा अनिल माळी या दोन महिलांत सामना रंगणार का ? याबाबत औत्सुक्य आहे.
राष्ट्रवादीतून नगराध्यक्षपदासाठी सौ. रोशना गोडसे, स्वप्नाली गोडसे, आरती काळे, यांच्यासह अपक्ष उमेदवार राधिका गोडसे व सौ. काळे यांची नावे चर्चेत होती. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे पाच, वंचितचा एक, अपक्ष तीन असे एकूण 9 नगरसेवक सहलीवर गेले होते. सर्व साधक बाधक चर्चा, जर तर ची गणिते पडताळून सर्वांनी एकमताने काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या अर्जासाठी माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे हे सुचक तर राधिका गोडसे अनुमोदक आहेत. अर्ज दाखल करतेवेळी एन. एस. गोडसे, माजी तालुकाध्यक्ष हिंदुराव गोडसे, युवा नेते पृथ्वीराज गोडसे, श्रीकांत काळे, गणेश गोडसे, धनाजीशेठ काळे, रविंद्र काळे, अॅड. राहूल काळे, आदी उपस्थित होते.
तर रेखा माळी यांचा अर्ज दाखल करतेवेळी नगरसेवक जयवंत पाटील, ओंकार चव्हाण, सौ. रेश्मा बनसोडे, अनिल माळी, सुनिल माळी उपस्थित होते. एकीकडे काळे समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे निवडक समर्थकांना बरोबर घेऊन माळी यांनी अर्ज दाखल केला आहे. माळी कंपनी गनिमी काव्याने कशी लढत देणार यावर या सामन्याचे भवितव्य असल्याची चर्चा आहे.
दिलजमाई अन् जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती
वडूजच्या राजकारणात गेली अनेक वर्ष जेष्ठ नेते दादासाहेब गोडसे गट, विरूध्द काळे (धनगर समाज ) गट अशी वादाची किनार होती. नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने दोन्ही गटांत मनापासून दिलजमाई होऊन मोठ्या मनाने आण्णा गटाने सौ. काळे यांच्या उमेदवारीस जाहीर समर्थन दिले आहे. तर नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात अनेक वावड्या उठल्या होत्या. गोडसे इतर समाजाचा केवळ वापर करून घेतात अशी चर्चा होती. या निमित्ताने गोडसे (मराठा) समाजातील तीन इच्छुक उमेदवार असताना सौ. काळे यांच्या उमेदवारीस पाठींबा देऊन वडूजमध्ये जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला जात नसल्याची प्रतिक्रीया एन. एस. गोडसे यांनी दिली.
0 Comments