बिजवडीतील सभेत प्रभाकर देशमुख यांचे प्रत्युत्तर
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बिजवडी: मागचे 15 वर्ष मी पुढचे 15 वर्ष मीच. काय ताम्रपट आहे का? हे अहंकाराचे लक्षण आहे. रावणाचा सुद्धा अहंकारानेच पराभव झाला होता. आमदार जयकुमार गोरे म्हणजे केवळ अहंकार असल्याची घणाघाती टीका करत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी बिजवडी येथील जाहीर सभेत गोरेंच्या दिवड येथील सभेतील आरोपांना प्रत्त्युत्तर दिले.
बिजवडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ पिंपराळे-येळेवाडी येथे देशमुख यांच्याहस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, माजी पंचायत समितीचे सभापती तानाजी कट्टे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, मनोज पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, विकास सेवा सोसायटी ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. तिचा स्वार्थासाठी वापर न करता सर्वसामान्य गरीब जनतेच्या फायद्यासाठी करावा. स्वार्थासाठी वापर करणार्यांना जनतेने चांगला धडा दिला आहे. या मधून त्यांनी शिकावं तुम्ही संस्था चालवायला पात्र नाही. ते लोकांशी वाईट वागले आहेत. तुम्ही चांगल वागून लोकांची कामं करा. जर तुमच्या बद्दल जनतेतून चुकीच्या गोष्टी बद्दल माझ्याकडे तक्रारी आल्या तर मी जनते सोबत असेन असा इशाराही प्रभाकर देशमुखांनी दिला.
बिजवडी सोसायटी बद्दल कोणी चांगलं बोलत नव्हते. ही संस्था चांगली दिसली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. यावेळी देशमुखांनी आमदार गोरेंवर जोरदार टीका केली. पवार साहेबांवर टीका करण्यापूर्वी त्यांची उंची तपासावी देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांना गुरू मानतात पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो असं जाहीर पणे सांगतात. मीही पवार साहेबांचा आदेश घेऊन राजकारणात आलोय. मी म्हणजेच सरकार या आमदार गोरेंच्या भूमिकेचाही त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. पवारबसाहेबांनी माढ्यातून दोन वेळा खासदारकी भूषवली आहे. त्यावेळी त्यांनी 175 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यावेळी अगणित बंधारे आले. साखळी सिमेंट बंधारे कोणी आणले. पृथ्वीराज बाबा म्हसवडला जात असताना त्यांना दुष्काळात एक हिरवेगार गाव दिसलं ते लोधवडे होते. त्याबद्दल त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली. त्यांनी विचारलं हे महाराष्ट्रभर करता येईल का?
एमआयडीसी निघाली कुठं?
माण तालुक्यांची एमआयडीसी जाऊ देणार नाही. अरे पण निघाली कुठं नेणार आहे कोण? आहे इथंच, कालच अजितदादांसोबत बोलणं झालं त्यांनी सांगितले कुठं जात नाही आहे तिथंच. एमआयडीसी आणली कोणी तर माणचे सुपुत्र अविनाश सुभेदार यांनी आणि त्यांनाच याचं श्रेय गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मग, पंधरा वर्षात का नाही उभी राहिली एमआयडीसी असा सवाल प्रभाकर देशमुखांनी केला.
तुमचं कर्तव्य आहे ते आधी करा. जिहे काठापूरच पाणी किती दिवसांत येणार होत. जादा पाण्याचं रिझर्वेशन घेतलं आहे का तर नाही त्यासाठी भांडा. सांगलीत पाणी जातंय टेंभूचे इकडे का येत नाही. हा तुमचा निष्क्रीय आणि नाकर्तेपणा आहे. बनगरवाडी परिसरात पाणी मिळणार नाही म्हणारे पाणी पूजनाला सर्वात प्रथम हजर.
एम. के. भोसले म्हणाले, आमची एक सीट गेली. माझा पुतण्या विरोधी पार्टी मधून उभा होता. परंतु, राजकारणात प्रामाणिक काम करत राहणे गरजेचे आहे. नाती-गोती लग्न समारंभात जपा.राजकारणात नाती गोती बाजूला ठेवा. देशमुख साहेब हे विरोधकासह सर्वाना मदत करणारे नेतृत्व आहे. साहेबांनी अनेक लोकांना वैद्यकीय मोफत मदत केली. परंतु त्यातीलच काहींनी विधानसभेला विरोधात काम केलं.
संजय भोसले म्हणाले, सोसायटीच्या निवडणुकीत तगडे नेतृत्व उभे होते. पण जनतेने पैशाच्या राजकारणाला मूठमाती दिली.
यावेळी एम.के भोसले यांनी सोसायटी मार्फत शेतकर्यांसाठी खते व बी- बियाणे दुकान सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला देशमुखांनी लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला.
कार्यक्रमास खरेदी विक्री चेअरमन बाबुराव काटकर, मार्केट कमिटी संचालक योगेश भोसले, कुंडलिक भोसले, जनार्दन भोसले, रंगाशेठ भोसले, विकास निंबाळकर, आनंदराव वीरकर,जयप्रकाश कट्टे, विक्रम शिंगाडे, शिवाजीराव महानवर, अशोक अडागळे, रुक्मिणी भोसले, पांडुरंग साळुंखे, कमल वीरकर, यशवंत गाढवे, शंकर जाधव, बापू दडस, विकास निंबाळकर, लालासाहेब पवार, प्रज्योत भोसले, दहिवडीचे नगरसेवक विशाल पोळ, महेंद्र जाधव, विष्णुपंत अवघडे उपस्थित होते.
सूत्रसंचालन विजय बरकडे यांनी केले.
मी प्रामाणिक गडी
विकासच राजकारण करा. वैयक्तिक पातळीवर येऊ नका. आमदार मला ते लोधावड्याचा गडी बोलतात. पण मी त्यांना बोराटवाडीचा गडी बोलणार नाही. कारण गडी हा प्रामाणिक असतो. तो कष्ट करून आपलं पोट भरत असतो. मी 380 जणांना नोकर्या दिल्या. तुम्ही 500 लोकांना द्या. टाकेवाडीच्या मेंढपाळाचा मुलगा बापू दडस सारख्या 123 जणांना मार्गदर्शन करून सेवेत आणलं. तुम्हीही असं काही तरी करा. निदान स्पर्धा परीक्षेविषयी एखादं वाक्य तरी बोला, असं सुनावत देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुलं शासकीय सेवेत जावी ही माझी इच्छा आहे. माण तालुक्यात पैशाचा वापर, गुंडगिरी करून माणचं राजकारण नासाविण्याचा काम या लोकांनी केलं. बँक निवडणूकत पैसे देऊन मते फोडण्याचे काम कोणी केलं. निर्ढावलेले लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही यावेळी केले.
0 Comments