Ticker

6/recent/ticker-posts

मराठी दिन की मराठी ‘दीन’

किशोर बोराटे
आपल्याला हे माहिती आहे का की मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भात महत्त्वाचे आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात सगळीकडे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या 5 जुलै 1960 च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले. महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होता. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.
मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. आपल्याला अभिमान वाटावा असे साहित्य मराठी भाषेत लिहिले गेले आहे. त्याने जगाच्या साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे.
संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, बहिणाबाई पासून ते कुसुमाग्रज, पुलं, वपु, यांच्यापर्यंत अनेक साहित्यिक, लेखक कवींनी मराठी भाषेवर संस्कार केले. बाकी सगळं जाऊ द्या, पण जी भाषा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज बोलायचे, तीच भाषा आपण बोलतो, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटायला एवढं कारण पुरेसे आहे.
आपली भाषा, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार हेच आपले अस्तित्त्व आहे. भाषा दिन साजरा करणे ही परंपरा असली, तरी आपल्या भाषेत आपण संवाद साधणे, ती जोपासणे, तिचा सन्मान करणे, ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे.  रोजच्या व्यवहारात आपल्या भाषेचा वापर आपण करत राहिलो, तर आपोआपच तिला प्रतिष्ठा प्राप्त होते.
प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतोच आणि असायलाच हवा. मराठी संस्कृती खर्‍या अर्थाने जर कुणी टिकवून ठेवली असेल, तर ती ग्रामीण महाराष्ट्राने टिकवून ठेवली.
मी स्वतः अनेकदा संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. पण सांगताना मला अतिशय वाईट वाटते की मुंबई, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात आपली मराठी लोकं सुद्धा सर्रास हिंदी बोलताना दिसतात. त्याबाबतीत पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण आपल्या भाषेच्या बाबतीत कट्टर आहेत. आपणच जर आपल्या भाषेला महत्त्व दिले नाही, तर मग इतर लोकं कशी देतील?  
चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण या क्षेत्राचा आणि त्यात वावरणार्‍या लोकांचा समाजमनावर खूप मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यात वावरणार्‍या मराठी लोकांनी प्रथम आपण मराठी आहोत आणि आपण मराठीतूनच संवाद साधणार याची खूणगाठ मनाशी पक्की बांधायला हवी. तरच समाजमनावर त्याचा प्रभाव राहील. पण तेथे वावरणारी मराठी लोकं  आपल्या भाषेला बाजूला सारून जर हिंदी आणि इंग्लिशला प्राधान्य देणार असतील, तर मग भाषा दिन वगैरे सगळं व्यर्थ आहे.
मराठी राज्याचे मुख्यमंत्रीच जर हिंदीतून संवाद साधत असतील, तर मग यांच्याकडून मराठीबाबत मराठी जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या?
शासकीय कारभार जर मराठी ऐवजी हिंदी आणि इंग्लिश मधून होत असेल तर मग मराठी भाषा पोरकी होणारच ना? आजही मुंबईत स्थावर-मालमत्तेचे व्यवहार हे इंग्लिश मधूनच होतात असे असेल तर मग मराठी भाषा दिन साजरा करण्याचा आणि मराठी बाबत बोलण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना उरतो का? नुसती उक्ती महत्त्वाची नाही, तर कृतीही हवी. फक्त मराठी मराठी करून मराठी भाषा वाढणार आहे का? मराठी भाषेबाबत जे काही कायदे केले आहेत, त्याचे तंतोतंत पालन होते का?
मुळात मराठी राज्यातच मराठीच्या वापरासाठी जर कायदे करावे लागत असतील, तर यापेक्षा ते दुर्दैव काय असू शकते?
प्रशासनात  मराठीच्या  वापराबाबत दरवर्षी निर्णय का करावा लागतो? आस्थापनांवरील फलक हे मराठी देवनागरी लिपीतच असावेत यासाठी आंदोलन का करावे लागते आणि जो कायदा आहे तो अंमलात आणावा यासाठी ज्यांनी आंदोलन केले, त्यांच्यावरच खटले का भरले जातात? या प्रश्‍नांची उत्तरे राज्यकर्ते देतील का? इथं मराठीचा पुळका आणणारे नेते परप्रांतात गेल्यावर मुंबईत मराठीपेक्षा जास्त तुमची भाषा बोलली जाते हे अभिमानाने सांगतात? आमच्या राज्यात या, आम्ही तुमच्या रक्षणाची जबाबदारी घेतो असे जाहीरपणे बोलतात? तुम्ही काय बोलता ते तुम्हाला तरी कळते का?
तुम्ही कुणापासून त्यांचे रक्षण करणार? तुम्ही मराठी माणसांच्या विरोधात उभे राहून त्यांचे रक्षण करणार? त्यापेक्षा तिथं जाऊन तुम्ही पोट भरण्यासाठी आमच्या राज्यात जरूर या. पण तिथं आल्यानंतर तिथले कायदे पाळा. तिथल्या मराठी लोकांचा, तिथल्या मराठी भाषेचा, संस्कृतीचा आदर करा. चुकीच्या लोकांना थारा देऊ नका असे सांगितले असते तर आम्हाला तुमचा अभिमान वाटला असता.
आता इकडे येऊन आज कोणत्या तोंडाने मराठीचे गोडवे गाणार आहात? तुम्हाला मराठीवर बोलण्याचा आणि मराठी भाषा दिन साजरा करण्याचा अधिकार तरी राहतो का? मराठी भाषा जपण्याची, वाढविण्याची आणि तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे हे लक्षात घ्यायला हवे. तरच हे भाषा दिन साजरे करायला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे.

Post a Comment

2 Comments

  1. खूप सुरेख आहे लेख. मराठी भाषेचे अस्तित्व जपणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

    ReplyDelete