सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: मनोरंजन हे देखील एक व्यक्त होण्याचं माध्यम असून प्रगत मोबाईल तंत्रज्ञानामुळे ते आपल्या हातात आले आहे. त्यामध्ये व्यक्त होताना केवळ लाईकसाठी नको तर आपल्या मनाला जे वाटेल ते ठामपणे मांडण्यासाठी व्यक्त व्हा, असे सांगतानाच माध्यमातून व्यक्त होताना दिशाभूल नको, असे स्पष्ट मत अभिनेते, लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
कवी कसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा दिनानिमित्त विश्व संवाद केंद्र पुणे यांच्यावतीने नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्व संवाद केंद्राचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार गोपळ जोशी, कराड येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जोशी, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. सुभाष दर्भे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सोमण म्हणाले, मनोरंजन ही एक गरज असून ते अत्यावश्यक आहे. नाट्यस्पर्धांनी कलावंतांच्या, प्रेक्षकांच्या पिढ्या घडवल्या. मात्र, छोट्या पडद्यामुळे रसिकतेला ओहोटी लागली. यात कलाकारांचा दोष नसून तो रसिकांचा आहे. कारण रसिकांच्या अभिरुचीमध्ये, वेळ देण्यामध्ये फरक पडला आहे.
जिवंत कला पाहण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी बाहेर पडणं बंद केलं, शिवाय त्याची आतुरता कमी झाल्यामुळेच या क्षेत्राला उतरती कळा लागल्याचं सांगत त्यांनी या क्षेत्रांती त्रुटींवर नेमकणेपणाने बोट ठेवलं तसेच परखड मतं मांडत अनेक मुद्द्यांची चीरफाड केली.
ओटीटी प्लॅटफॉर्म हे उद्याचं भविष्य असून तेथे सर्व प्रकारचे कंटेंट तेही सहज उपलब्ध असून तिथे मराठी भाषा पोचणं गरजेचं असल्याचं सोमण म्हणाले. राजकीय भाष्य करताना 2014 नंतर प्रेक्षकांचा एक असा समुह निर्माण झाला जो व व्यक्त होऊ लागला, समोरून येणार्या प्रश्नांना उत्तर देऊ लागला. यातून काही चित्रपट देखील पडू लागले या फॉल्स नॅरेटिव्ह (चुकीच्या कथ्यांचा) विचार दिग्दर्शक, निर्मात्यांना करावा लागणार आहे. प्रेक्षक पूर्वी भाबडे होते. मात्र, आता त्यांच्या मनोभूमिकेमध्ये बदल झाला असून माणसं समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होऊ लागली आहेत. शिवाय आदरांच्या स्थानांवर टीका होऊ लागल्यामुळे त्याला जशास तसे उत्तर दिले जाऊ लागले आहेत, असे सोमण यांनी सांगितले.
सातारा हे माझ्यासाठी मनोरंजनाचं अंगण असून सातार्यातून मोठा प्रेक्षक वर्ग घडल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. भारतीय विचार साधनेकडून प्रकाशित 16 पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गोपाळ जोशी यांनी प्रास्ताविकात माध्यम संवाद परिषदेचे महत्त्व आणि हेतू विषद केला. विजयराव जोशी यांनी समारोप केला. डॉ. राजेंद्र माने यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा जपली पाहिजे, असे सांगितले. अॅड. सीमंतिनी नूलकर यांनी परिचय करुन दिला. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कांबळे यांनी आभार मानले.
शहर परिसरातील असंख्य माध्यमकर्मी यावेळी उपस्थित होते. रा. स्व. संघ स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
0 Comments