Ticker

6/recent/ticker-posts

माण तहसीलदारांची उचलबांगडी, प्रांतांना नोटीस

 ‘सत्य सह्याद्री’चा दणका, वाळू तस्करांना अभय भोवणार, रिचर्ड यानथन नवे तहसीलदार, तलाठीही रडारवर

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
माण तालुक्यात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत ‘सत्य सह्याद्री’ने गेल्या महिन्यात सातत्याने आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वाळूमाफियांना अभय देत पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देणारे एक प्रकरण उघड झाल्यानंतर वाकीचा तलाठी संतोष ढोले, तहसीलदार सूर्यकांत येवले व प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी केल्याची चर्चा असून त्यांच्या जागी रिचर्ड यानथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून वाळूमाफियांचे धाबेही चांगलेच दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, माण तालुक्यात प्रचंड वाळू उपसा होत असल्याबाबतचे वृत्त ‘सत्य सह्याद्री’मध्ये सातत्याने प्रसिद्ध होत होते. याबाबत यंत्रणेला माहिती असूनही कारवाई होत नव्हती त्यामुळे आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप होत होता. आता जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे प्रशासनाची माफियांशी असलेली हातमिळवणी सिद्ध झाली आहे.
गेल्या महिन्यात वाकी येथे वाळूचोरीचे प्रकरण उजेडात आणून वाळूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊनही पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा अहवाल मंडलाधिकार्‍यांनी दिला होता. मात्र, जिल्हाधिकार्‍यांकडे घडलेल्या वस्तुस्थितीचा व्हिडीओ पोचल्याने तलाठ्यापासून प्रांतांपर्यंत सार्‍यांचीच पोलखोल झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी तलाठी संतोष ढोले, तहसीलदार सूर्यकांत येवले तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.   वाळूचोरी रोखण्यासाठी केलेल्या गस्त पथकातील म्हसवडच्या मंडलाधिकार्‍यांनी   22 फेब्रुवारी रोजी  रात्री 1.20 वाजता  वाकी येथील माणगंगा नदीमधील वाळूचे खड्डे व एक ट्रॅक्टर त्यांचे समोरुन अंधाराचा गैरफायदा घेवून पळून गेला. तद्नंतर सदर ठिकाणी 10 ते 12 अनोळखी लोक जमा झाले. त्यामुळे पथक त्याठिकाणाहून निघून गेल्याचा अहवाल सादर केला. संबधित इसमावरती गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार मंडलाधिकारी म्हसवड हे सायंकाळी 6.30 वाजता म्हसवड पोलीस स्टेशन येथे गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड यानी गुन्हा दाखल करून घेणार नाही. त्या प्रत्राची पोहच देणार नाही, असे सांगितले. त्यांनी पत्र घेतले नाही. पथक रात्री 9.50 पर्यंत पोलीस स्टेशन मध्ये थांबल्याचा अहवाल  23 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांकडे  सादर केला.
 मात्र, त्याच 23 फेब्रुवारी  रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या व्हाट्सअ‍ॅप वरती प्राप्त ऑडीओ व व्हिडीओ क्लीप याची पहाणी केली असता सदर पथकास वाळूने भरलेला ट्रॅक्टर सापडल्याचे दिसून आले. असे असताना सुध्दा मंडलाधिकारी यांनी आपणांस चुकीचा अहवाल सादर केला व तहसिलदारांनी वस्तुस्थितीची खातरजमा न  करता त्या मंडलाधिकार्‍याला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले.  अवैध गौणखनिजाची उत्खनन व वाहतूक करणार्‍या इसमावरती कठोर कारवाई न करता अभय देऊन अवैध उत्खनन व वाहतूक करणेस प्रोत्साहन दिल्याचे दिसून येत आहे व सदर कृतीव्दारे महसूल प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांवर ठेवला असून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. शिवाय त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही.
तडजोडीत तलाठी ढोलेंचे नाव
 22 फेब्रुवारी रोजीची कारवाई होत असताना धैर्यशील पाटील व हणमंत पाटील यांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी वापरलेल्या लाल रंगाचा ट्रॅक्टर पथकासमोर वाळूने भरलेली ट्रॉली व शेजारी उत्खननासाठी वापरलेली साधने असलेला व्हीडीओ, रेकॉर्ड, जिल्हाधिकार्‍यांकडे पोचले असून प्राप्त व्हीडीओ शुटिंग व रेकॉर्डिंग यावरुन अवैध गौणखनिज वाळूचे उत्खनन वाहतूक करणार्‍या संबधीत इसमांशी तडजोडीची भाषा करत असताना तलाठी संतोष ढोले यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले असून ढोले यांनी परस्पर गौणखनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावणेसाठी संबधित पथकास कारवाईपासून परावृत करणेसाठी जाणिवपूर्वक कार्यवाही केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. ढोले यांनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करुन सदर पथकास दिशाभूल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास अडथळा निर्माण केल्याचे नोटिशीत नमूद करत. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकीमध्ये तुमचा सहभाग असलेचे दर्शविले आहे. त्यामुळे तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करणेत येऊ नये, अशी नोटीस ढोले यांना बजावली असून त्यांनाही 24 तासात खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

प्रांत सूर्यवंशी यांच्यावरही प्रकरण शेकणार

वाळू चोरीचे मुद्दे नमूद करत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त होणार्‍या तक्रारी व वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची परिणामकारक व ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रशासकीय कामकाज सचोटी व पारदर्शकतेचा अवलंब न करता कामकाज करत असल्याचे माझे मत झालेले आहे. त्यामुळे उक्त नमूद परिपत्रकातील परिच्छेद 11 नुसार शिस्तभंगाची कारवाई का करणेत येऊ नये याबाबत तुम्ही तुमचा लेखी खुलासा शासन परिपत्रकातील नमूद बाबी व तुम्ही तुमचे कार्यवाहीबाबत सबळ पुराव्यासह सदरची नोटीस मिळालेपासून 24 तासाचे आत माझे समक्ष सादर करणेचा आहे. यामध्ये कसूर केलेस तुमचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी नोटिसीत नमूद केले आहे.

सत्य सह्याद्रीवर अभिनंदनाचा वर्षाव

 माण तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात ‘सत्य सह्याद्री’ने सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे कारवाईची बातमी तालुक्यात समजताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गांभीर्याने हे प्रकरण घेतल्याने महसूल विभागातील खाबूगिरी करणारे बाबू हादरले आहेत. आता जिल्हाधिकार्‍यांनी साफसफाई मोहिम हाती घेऊन माफियांशी साटेलोटे असणार्‍यांना सुटी देऊ नये, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. मध्यंतरी वाळूसाठीचा हप्ता घेणारा तहसीलदारांचा चालकच रंगेहाथ सापडला होता. त्यानंतरही अनेकजण आपल्याला काय होतंय या भ्रमात होते. परंतु, या कारवाईमुळे त्यांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments