Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाकर देशमुख शब्द न पाळणारे नेतेनगराध्यक्ष निवडीवरून शेखर गोरेंची टीका

 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले:
  दहिवडी नगरपंचायतीत अपक्ष उमेदवार हा आमच्या विचाराचा होता.त्यामुळे आम्ही त्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. निवडीनंतरही अपक्ष उमेदवाराने आमच्याशी संपर्क साधला होता. सध्या ते राष्ट्रवादीच्या बरोबर असले तरी नगरपंचायतच्या सत्तेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही अपक्ष नगरसेवकाशी संपर्क साधला होता. यादरम्यान राष्ट्रवादीने मला अडकवण्यासाठी खोट्या अपरहणाचे नाटक केले. वास्तविक आमच्या चर्चेनंतर मी स्वत: त्या नगरसेवकाला माघारी सोडले. यावेळी राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख यांच्याशीही आमची चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी नगरपंचायत संदर्भात आपल्याला पहिला शब्द दिला होता. त्यानंतर दुसर्‍या बैठकीत आगामी निवडणूका एकत्र लढवण्यासंदर्भात तसेच नगरपंचायती संदर्भातला दुसरा शब्द दिला होता. मात्र त्यांनी आम्हाला दोनवेळा दिलेले शब्द पाळले नाहीत.तालुक्यात शब्द न पाळणारा नेता म्हणून आपली ओळख होवू नये यासाठी तरी त्यांनी यापुढील काळात काम करावे हा आमचा सल्ला राहील. आगामी जि. प. पं. स. , म्हसवड नगरपालिका एकत्र लढवण्यासंदर्भात आम्ही विचार करत होतो.मात्र शब्द न पाळणार्‍या लोकांसोबत जाण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे.मार्केट कमिटी, दहिवडी नगरपंचायत प्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आपली ताकद दाखवून देईल असा इशाराही शिवसेनेचे युवानेते व जि. बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  दिला आहे.
शेखर गोरे म्हणाले ,आपली राज्यात सत्ता आहे. एकविचाराने राहिलो तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यावर वर्चस्व मिळवू शकतो. यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढवण्यासाठी सकारात्मक होतो.प्रभाकर देशमुख दिलेला शब्द पाळतील असे वाटत होते.परंतू स्वत: राजकारणात काहीच करत नाहीत अन कुणाला काही करून देत नाहीत असे बगलबच्चे व भुरट्यांच्या ऐकण्यावरून देशमुखांनी दिलेला शब्द फिरवला. मार्केट कमिटीला ही आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचे मानसिकतेत होतो. मात्र याच भुरटे व बगलबच्च्यांचे ऐकून शिवसेनेला कमी लेखण्याची चूक त्यांनी केली होती. अन सत्तेपासून दूर राहण्याची किंमतही त्यांना मोजावी लागली.माण तालुक्यात शिवसेनेला कमी समजणार्‍यांना मार्केट कमिटी व दहिवडी नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेची ताकद दाखवून दिलीय. कोणाला पाडायचे अन कोणाला निवडून आणायचे हे शिवसेना ठरवू शकते तेवढी ताकद आम्ही निमार्ण केलीय. याचे ज्वलंत उदाहरण दहिवडी नगरपंचायतीतले आहे.दहिवडी नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना पँनेल टाकू शकत नाही अशी चर्चा होती.त्याच भीतीने आमच्या काही प्रमुखांनी आमची साथ सोडली.
आपण उशीरा का होईना पण नगरपंचायतच्या निवडणूकीत लक्ष घालत नवख्या युवकांना बरोबर घेत फळी उभी करून अगदी शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली.पाच जागा लढवत तीन जागांवर यश मिळवले.  एक उमेदवार फक्त वीस मतांनी पराभूत झालाय. दहिवडीतील दिग्गज नेतेमंडळींना आमच्या शिलेदारांनी पराभूत केलेय तर काहींना घाम फोडण्याचे काम केलेय.त्यामुळे शिवसेनेची काय ताकद आहे ते सर्वांना समजलेय.   अर्ध्या हळकुडांने पिवळे होणार्‍यांना सत्ता स्थापनेत आमच्या मदतीचा व दिलेल्या शब्दांचा विसर पडला असून आगामी निवडणूका व नगरपंचायतीत येणार्‍या काळात शिवसेना पुन्हा आपली ताकद दाखवून देईल असा इशाराही त्यांनी दिला.

भुरट्यांनो सर्वांना पुरून ऊरणारी आमची औलाद

दहिवडी नगरपंचायतच्या सत्तेसंदर्भात आम्ही अपक्ष नगरसेवकाशी चर्चेसाठी संपर्क केला होता.राष्ट्रवादीच्या लोकांनी या चर्चेला अपहरणाचे स्वरूप आणत आमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला.अपहरणाच नाटक करून आमच्यावर ट्रॅप लावणारे अजून जन्मायचेत.त्यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी ती स्वप्नेही पाहू नयेत.सर्वांना पुरून उरणारी आमची औलाद आहे.आम्ही एक तर कोणाच्या वाटेला जात नाही अन एखादा आमच्या अंगावरच आलाच तर त्याला सोडतही नाही. शेखर गोरेच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर याद राखा.राजकारण राहील बाजूला पण भुरट्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.दहिवडीतील भुरट्यांनीही हा इशाराच समजावा.अन ज्याच्यांत दम असेल त्यांनी वेळ , तारीख अन ठिकाण सांगावे, असा इशाराही शेखर गोरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार शिवसेनेमुळे नगरसेवक

नगरपंचायत निवडणूकीत आमच्याशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना सर्व बाजूने ताकद दिली होती.शिवसेनेमुळेच ते आज नगरसेवक आहेत.
आमची मदत नसती तर ते आज नगरसेवक नसते. अन आता जे सत्तेत बसलेत ते घरी बसले असते.त्या तीन नगरसेवकांचा जर आपण फक्त राष्ट्रवादीमुळेच जिंकलोय असा भ्रम झाला असेल तर त्यांचाही हा शेवटचा गुलाल असेल.त्यांनी राजीनामा देऊन फक्त पुन्हा निवडून येऊन दाखवावे.केलेल्या मदतीची जाणीव ठेवत त्यांनी वागावे, असेही शेखर गोरे यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments