Ticker

6/recent/ticker-posts

कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित

पाटण/ प्रतिनिधी
सातारा जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर 21 मार्च पासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे सुरू होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.  

कोयना प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर अंतिम करून जमीन वाटप तातडीने सुरू करावे, आणि २०१८ पासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रधान सचिव पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्देश दिल्याप्रमाणे अंमलबजावणी तातडीने सुरू करावी यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन करण्याची तयारी करून त्या प्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. त्याची प्रत जिल्हाधिकारी, प्रधान सचिव पुनर्वसन व संबंधित मंत्री यांना सुद्धा देण्यात आली होती.
त्यानुसार काल तारीख १७ रोजी सातारा जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्र. अतिरिक्त जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता कृष्णा खोरे सिंचन व पाटबंधारे मंडळ, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सोलापूर जिल्ह्याचे अधिकारी, वन खात्याचे अधिकारी,  सर्व संबंधित अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी चैतन्य दळवी, संतोष गोटल, महेश शेलार, सचिन कदम, , सीताराम पवार, रामचंद्र कदम,प्रकाश साळुंखे राजाराम निवळे इत्यादी सह बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पातळीवरील प्रश्नांची  १५ एप्रिल पर्यंत सोडवणूक करून, सोलापूर, ठाणे, रायगड व ठाणे जिल्ह्यांचे कॅम्प लाऊन एप्रिल अखेर  अद्याप पर्यंत अजिबात जमिन न दिलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जमीन वाटप सुरू करू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकल्पग्रस्तांना नोटीस देण्यात येऊन माहिती घेण्यात येईल, अभयारण्यातील अतिक्रमणे, कोयना प्रकल्पासाठी संपादन झालेल्या जमिनीतील अतिक्रमणे काढण्याची तातडीने काढण्याचे निर्देश दिले. तसेच कांदाटी खोऱ्यातील गावांच्यामध्ये अभयारण्याचे गट नंबर आहेत त्यांची मोजणी करून नकाशे तयार करण्याचेही ठरले. याचप्रमाणे रासाठी, गोकुळ व शिवंदेशवर यांच्या पुनर्वसनाचा शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यामुळे आंदोलन करण्यापासून परावृत्त व्हावे असे लेखी पत्र दिले.
त्याचप्रमाणे प्रधान सचिव पुनर्वसन यांनी ता. २२ रोजी स. ११:३० वा. यासंबंधी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे ता. २१ रोजी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. जर प्रधान सचिव यांच्या बरोबर बैठक होऊन ठरल्याप्रमाणे सर्व मुद्यांची सोडवणूक झाली नाही तर पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल  आणि ते सुरु झालेले आंदोलन जमीन वाटप सुरू झाल्या शिवाय आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशप्रमाणे कार्यवाही झाल्या शिवाय मागे घेतले जाणार नाही असा निर्धार या कोयना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाची तारीख जनतेच्या सोयीनुसार या नंतर जाहीर करण्यात येईल.
फोटो - डॉ भारत पाटणकर

Post a Comment

0 Comments