सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक करून फसवणुकीची तक्रार दिल्याच्या रागातून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण व जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच खंडणी मागणी व 1 लाखांची लूट केल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे, जयश्री दिगंबर आगवणे (दोघे, रा. गिरवी) यांच्यासह नऊजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आगवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यात फसवणूक, धमकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.
याबाबत रणजित संदीप धुमाळ (वय 24, रा. खुंटे, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. आगवणे दाम्पत्यासह स्नेहल रवींद्र बनसोडे (रा. गिरवी, ता. फलटण), आदिनाथ मोटे (पूर्ण नाव माहित नाही, रा. सरडे, ता. फलटण), नितीन करे (पूर्ण नाव माहित नाही, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड (पूर्ण नाव माहित नाही, रा. आसू, ता. फलटण), अनिल सरक (पूर्ण नाव माहित नाही, रा. नांदल, ता. फलटण) व उमेश कुमार (पूर्ण नाव माहित नाही, रा. ठाणे, मुंबई) व एक अनोळखी व्यक्ती, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वरील सर्व संशयितांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोपरी, जि. ठाणे येथील शाखाप्रमुख व एक एजंटच्या सहाय्याने वेळोवेळी बनावट कागटदपत्रे तयार करून त्यावर रणजित धुमाळ आणि प्रयण मतकर यांच्या खोट्या सह्या करून दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धुमाळ यांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली. याचा राग मनात धरून संशयितांनी धुमाळ यांना जबरदस्तीने पळवून नेऊन डांबून ठेवत खोटी कागदपत्रे तयार करत त्यावर जबरदस्तीने सह्या घेतल्या याशिवाय रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच वेळोवेळी जबरदस्तीने 1 लाख रुपये, मोबाईल, हॅन्डसेट व घड्याळ काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याची माहिती घेत उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासाच्या सूचना केल्या. तपास पोलीस निरीक्षक गोडसे करत आहेत.
स्टेट बँकेची 1 कोटींची फसवणूक
सातारा: तब्बल 142 कोटींच्या कजासाठी आधीच तारण असलेल्या जमिनीवर पुन्हा एक कोटी 15 लाखांचे तारणकर्ज घेऊन भारतीय स्टेट बँकेची आगवणे कुटुंबीयांनी फसवणूक केल्याची फिर्याद बँकेच्या गोडोली शाखेचे शाखाप्रमुख संदीप राव काबंळे (वय 42) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित दिगंबर रोहिदास आगवणे, जयश्री दिगंबर आगवणे, रोहिदास नामदेव आगवणे, सत्यवान धर्मराज आगवणे, भीमराव गुलाबराव माने (सर्व रा. गिरवी, ता. फलटण) यांनी संगनमताने 2014 साली पिंपळवाडी, ता. फलटण येथील सर्वे नं. 64/4 मधील 40 गुंठे जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक व बँक ऑफ इंडिया या बँकाना तारण देऊन 142 कोटी 13 लाख रुपये कर्ज घेतले होते. ही बाब भारतीय स्टेट बँकेपासून लपवून ठेवून याच जमिनीवर 1 कोटी 15 लाख रुपये तारण कर्ज घेत बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केली. तपास उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.
0 Comments