Ticker

6/recent/ticker-posts

वडूजला चोरट्यांचा धुमाकूळ सव्वा सात लाखाच्या ऐवजावर डल्ला, पोलिसांना चोरट्यांचे ओपन चॅलेंज

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वडूज:  वडूज, ता. खटाव येथे मंगळवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी घरफोड्या करून तब्बल सव्वासात लाख रुपयांचा ऐवज लुटला पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोड्या करून चोरट्यांनी वडूज पोलिसांना ओपन चॅलेंज दिले आहे.

कर्मवीरनगरमध्ये डॉक्टरचे घर फोडले

कर्मवीरनगर येथे रहाणारे डॉ. सचिन किशोर साळुंखे (मूळ रा. कलेढोण, ता. खटाव)  यांच्या रहात्या घराच्या दरवाजाचे कुलूप कशानेतरी तोडून चोरट्यांनी घरातून 2 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तपास सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख करत आहेत. 

करमारेंच्या घरी पावणेचार लाखांवर डल्ला

येथील कृष्णा विठोबा करमारे (वय 72) यांच्या रहात्या घराच्या दरवाजाचे कुलूप कशानेतरी तोडून चोरट्यांनी तब्बल पावणेचार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट दिली. 

चोरट्यांनी करमारे यांच्या घरात घुसून 2 लाख रुपयांचे 50 ग्रॅम वजनाचे गंठण, 1 लाख 20 हजार रुपयांची सोन्याची बोरमाळ व 54 हजार रुपये रोख रक्कम असा 3 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत. 

दरम्यान, गेल्या महिनाभरात परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान करत चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे. 

Post a Comment

0 Comments