रामराजेंचे मौन तारक की मारक? दोन्ही डगरीवर न रहाता उघड भूमिका घेण्याची वेळ - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 13, 2024

रामराजेंचे मौन तारक की मारक? दोन्ही डगरीवर न रहाता उघड भूमिका घेण्याची वेळ

संदीप कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
लोकसभा निवडणुकांमध्ये रणजितसिंह निंबाळकर नको म्हणून रुसलेल्या रामराजे नाईक-निंबाळकरांनी निवडणूक काळात ‘मौन’ पाळून ‘तुतारी’ला मदत केली. त्यावेळी रामराजे उघडपणे सोबत नसताना त्यांचे सैन्य आणि कुटुंबीय मोहिते-पाटलांच्या प्रचारात मनापासून सहभागी झाले होते. तरीही भाजपला फलटण तालुक्यात मताधिक्य मिळाले होते. आता विधानसभेसाठी साधारण समीकरण तसेच आहे फरक एवढाच आहे की सैन्य आणि कुटुंबीय अधिकृतपणे ‘तुतारी’च्या प्रचारात आणि समोर रामराजे तांत्रिकदृष्ट्या ज्या राष्ट्रवादीत आहेत त्या राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आहे. तरीही रामराजे ‘मौन’ पाळून आहेत. त्यामुळे हे ‘मौन’ त्यांना तारक ठरणार की मारक? याबाबत फलटण तालुक्यात उलटसुलट चर्चा असून दोन्ही डगरीवर न रहाता ‘मौन’ सोडून उघड भूमिका घेण्याची गरज असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
सातारा जिल्हा हा सातत्याने यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे मानसपुत्र शरद पवार यांना मानणारा ठरत आला असला तरी अलीकडच्या दहा वर्षांत अनेक संदर्भ बदलले आहेत. राष्ट्रवादीची फूट अगदी अलीकडची असली तरी भाजप शिवसेनेने जिल्ह्यात पाच ते दहा वर्षांपूर्वीच बर्‍यापैकी शिरकाव केलेला आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा हक्काचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याचे नेते म्हणून रामराजे यांच्याकडे निर्विवादपणे पाहिले जात होते व त्यांनी तो आब राखला देखील होता. मात्र, आता राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद, राष्ट्रवादीची शकले यातून रामराजेंना जिल्ह्याचे नेतेपद गमावण्याची वेळ आल्याचे मानले जात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीचे विभाजन झाले तेव्हा रामराजेंनी भाजप सोबत जायचे आहे, हे माहित असूनही अजितदादांची साथ दिली. त्यामागे त्यांचा कोणता राजकीय फायदा होता, हे ‘गुपित’ असले तरी  लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोध करत त्यांनी शरद पवार गटाला अंतर्गत मदत केली. मात्र, फलटण आणि माण तालुक्यात त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. उलट दोन्ही तालुक्यांत भाजपलाच मताधिक्य मिळाले. आता विधानसभेला तर दस्तुरखुद्द अजित पवारांनी फलटणला येऊन सभेतून त्यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. शिवाय बारामतीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी रामराजे प्रचारात दिसत नसल्याने नोटीस काढतो, असे सांगितले होते. त्यावर नोटीस आल्यावर बोलू असे रामराजे म्हणालेही. मात्र, अजित पवार फलटणला येऊन ‘श्रीमंतां’चा पाणउतारा करून गेले तरीही रामराजेंनी त्यावरही ‘मौन’च बाळगले.
सद्यस्थितीत रामराजे केवळ तांत्रिकदृष्ट्या अजित पवार गटात असल्याचे स्पष्ट आहे. शिवाय गेल्या अडीच वर्षात महायुतीची सत्ता आल्यानंतर प्रशासनावर खासदार उदयनराजे भोसले,  शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, महेश शिंदे यांनी पकड निर्माण केली. तिकडे फलटमध्येही प्रशासनावर भाजपचा वरचष्मा राहिल्याने रामराजेंची नाकेबंदी झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे रामराजेंनी फलटण सोडलेच नाही. केवळ फलटण-अकलूज, फलटण-मुंबई असेच त्यांचे दौरे राहिले. काही काम अथवा जिल्हा बँकेची बैठक असली तरच सातारा आणि सातार्‍यात येऊनही त्यांनी धैर्यशील मोहिते-पाटलांसाठी काम करणार्‍यांसोबत बैठका घेऊन छुप्या पद्धतीने शरद पवारांसाठी काम केल्याचेही समोर आले. मात्र, त्यावरही त्यांनी कधीच स्पष्टीकरण न देता ‘मौन’च बाळगण्याचे काम केले.
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तसेच फारवेळाचा मित्रही नसतो. त्यामुळे अंतर्गत विरोध करुन स्वत:ची पोळी भाजण्यापेक्षा उघडपणे राजकारण करून आपली पत राखणे केव्हाही चांगले, असे राजकीय जाणकार सांगतात. नाहीतर धड इकडेही नाही आणि तिकडेही नाही, अशी अवस्था व्हायला वेळ लागत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे रामराजेंसारख्या बड्या नेत्याने आता उघड भूमिका घ्यायला हरकत नाही, अशी चर्चा जिल्हाभरातून होत आहे.

No comments:

Post a Comment