महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, मुख्याधिकारी मा. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांच्या कालखंडानंतर क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाबळेश्वर शहरातील १३ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला नगरपरिषदेच्या वतीने टी- शर्ट व कॅप देण्यात आली आहे. या क्रिडा महोत्सवाची सुरुवात १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मुख्याधिकारी, योगेश पाटील यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करून शहरातील नगरपरिषद व खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या क्रिडा रॅलीने करण्यात आली.यावेळी नगरपरिषदेचे मुख्य लिपिक,आबाजी ढोबळे,वृक्ष अधिकारी, कल्याण हिवरे, तसेच अहमद नालबंद,बबन जाधव, सचिन दिक्षित उपस्थित होते.रॅली मुख्य बाजारपेठ मार्गे येथील प्रसिद्ध अशा गोल्फ मैदान येथे पोहचली. गोल्फ मैदान येथे खेळाडूंचे संचलन व मान्यवरांना मानवंदना होऊन ट्रिपल महाराष्ट्र केसरी व सध्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री. विजय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, पो.नि.बापूसाहेब सांडभोर, उद्योगपती रमेश पलोड, माजी नगरसेवक, सुनिल शिंदे उपस्थित होते.
गेले ५ वर्षांपासून बंद पडलेला शालेय क्रिडा महोत्सव परत नव्या पर्वाने सुरु करण्यात आला असून सदर क्रिडा महोत्सवात एकूण ११ प्रकारचे खेळ समाविष्ट आहेत व ४ गटातील मुले व मुली यांच्या गटात या स्पर्धा पार पडणार आहेत. विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य , कांस्य पदक व प्रशिस्तीपत्रक व सर्व सहभागी खेळाडूंना प्रशिस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे . सदरच्या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अधिकारी - कर्मचारी व विविध शाळांमधील शिक्षक असे सुमारे ४० जण मेहनत घेत आहेत.
चौकट:- या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे जास्तीत जास्त पदके जिंकणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक गटातील मुले व मुली असे एकूण चार जनरल चॅम्पियनशिप विजेते काढण्यात येणार असून त्यासाठी मोठे चषक शाळेस प्रदान केले जाणार असून हा गौरव विद्यार्थ्यांच्या खेळातील गुणवत्ता व शालेय संघाच्या एकत्रित मेहनतीचे प्रतीक ठरेल तसेच विद्यार्थ्यांना व संस्थेस प्रेरणादायी ठरेल , तरी महाबळेश्वर मधील नागरिक - पालक व क्रिडाप्रेमींनी या महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे
मा. योगेश बाळकृष्ण पाटील, प्रशासक तथा मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद
No comments:
Post a Comment