सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला परिसरात वाढत चाललेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याच्या पायथ्याशी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. ऐतिहासिक अन पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या या किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने विविध अनुचित प्रकार घडत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अजिंक्यतारा किल्ला हा सातारा शहराचे वैभव मानला जातो. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात या किल्ल्याला विशेष स्थान आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी या किल्ल्यावरून राज्यकारभार केला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा गड पावन झाल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक अन पर्यटक भेट देत असतात.
मात्र गेल्या काही काळात किल्ला परिसरात गैरप्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी दारू पिणे, अमली पदार्थांचे सेवन तसेच अश्लील प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
परिसरात दारूच्या बाटल्या, गांजाच्या पुड्या तसेच इतर साहित्य आढळत असल्याने किल्ल्याच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याने अशा प्रकारांना आळा बसत नाही, अशीही भावना व्यक्त होत आहे. काही वेळा किल्ल्यावर आत्महत्यांचे प्रकार घडल्याच्या घटनाही यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेची उपस्थिती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवी मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारल्यास किल्ला परिसरात नियंत्रण ठेवणे सोपे होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नियमित गस्त आणि पोलीस बंदोबस्त असल्यास गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच किल्ल्याचे पावित्र्य टिकवण्यासाठी अजिंक्यतारा किल्ला परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.
शिवप्रतिष्ठानने दिले निवेदन
अजिंक्यतारा किल्ल्यावर पोलीस चौकी उभारण्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाप्रमुख सतीश बापू ओतारी यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी अभिजीत बारटक्के, अजिंक्य गुजर, अमोल खोपडे, ऋषिकेश मतकर अन शुभम शिंदे उपस्थित होते.

0 Comments