Ticker

6/recent/ticker-posts

साताऱ्याचे एसपी तुषार दोशींचं निलंबन मागे; उपसभापतींचा आदेश सभापतींकडून रद्द

सातारा/मुंबई 

सातारा जिल्हा परिषद निवडीतल्या धक्काबुक्की प्रकरणावरून राज्यात गाजलेल्या वादाला नवं वळण मिळालं आहे. विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेले निलंबनाचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी रद्द करत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन मागे घेतलं आहे. या निर्णयामुळे आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात आणखी खळबळ उडाली आहे.

झेडपी निवडीतल्या गोंधळानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात सविस्तर घटनाक्रम मांडत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. “मंत्र्यांवर अरेरावी झाली, सदस्यांना मतदानापासून रोखलं,” असा आरोप करत त्यांनी एसपींसह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते.

मात्र या निर्णयावर सुरुवातीपासूनच आक्षेप नोंदवले जात होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी “अहवाल न घेता कारवाई करू नये,” अशी भूमिका घेत निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. “केवळ सभागृहातील चर्चेवरून अधिकारी निलंबित होऊ शकत नाहीत,” असे ते म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींच्या आदेशावर निर्णय राखून ठेवला होता. अखेर हा आदेश रद्द करत निलंबन मागे घेण्यात आले. यामुळे कारवाईच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. “वस्तुस्थिती तपासून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

झेडपी निवडीतल्या राड्यापासून सुरू झालेला वाद आता पोलिसांच्या कारवाईपर्यंत पोहोचला असून, निलंबन मागे घेतल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी उधाण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments