Ticker

6/recent/ticker-posts

दहिवडीत अपघातांची मालिका; दोन ठिकाणी दोन बळी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

गोंदवले :

दहिवडी परिसरात बुधवारी अपघातांची मालिका पाहायला मिळाली असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पहिली घटना दहिवडी-फलटण-नातेपुते मार्गावरील कलिंगड चौक (जोडमैल) येथे घडली. बबन भगवान चव्हाण (वय ६०, रा. मोही) आणि सूरज अनिल फासे (वय ३५, रा. दहिवडी) हे आपल्या-आपल्या कामानिमित्त विरुद्ध दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका जोरदार होता की दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ धाव घेत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमींना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच सूरज फासे यांचा मृत्यू झाला. बबन चव्हाण यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी त्यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दुसरा अपघात दहिवडी-राणंद मार्गावरील मुळीकवस्ती जवळील वीटभट्टी परिसरात घडला. संपत जोतीराम गलंडे (वय ४०, मूळ रा. सोकासन, सध्या रा. शेवरी) हे दहिवडीकडे येत असताना अचानक रस्त्याच्या कडेला पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या सलग दोन घटनांमुळे दहिवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.


फोटो : मृत्यू सुरज फासे 

Post a Comment

0 Comments