Ticker

6/recent/ticker-posts

डंपरची धडक; कराडला प्राध्यापिका ठार


 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कराड: शहरातील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका या मार्गावर जनता बँकेसमोर बुधवारी सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

मृत महिलेचे नाव सुषमा कीर्तने (रा. हजारमाची) असे असून त्या विद्यानगर परिसरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक  कार्यरत होत्या, अशी माहिती मिळाली आहे. 

त्या दुचाकीवरून जात असताना जनता बँकेसमोर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी भरधाव येणाऱ्या डंपरने त्यांना जोराची धडक दिली. धडकेनंतर त्या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, वाहतूक शाखेचे कर्मचारी माळी व चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या रस्त्यावर झाडी, अडथळे तसेच अपुरी दृश्यता असल्याने वाहनचालकांना समोरचा अंदाज येत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments