सातारा : अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी संकेत स्वरूप गुजर (वय २५, रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ, सध्या शाहूपुरी, सातारा) यास जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी हा निकाल दिला.
दि. २१ मार्च २०२२ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपीने कपड्यांच्या दुकानासमोर झोपलेल्या पारधी समाजातील महिलेजवळ जाऊन फूस लावली. त्यानंतर चार वर्षांच्या बालिकेला पालकांच्या देखरेखीमधून जबरदस्तीने उचलून दुचाकीवरून खिंडवाडी परिसरात नेले. तेथे निर्जन ठिकाणी नेऊन बालिकेवर अत्याचार करून आरोपी फरार झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा) तसेच पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केला. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्यादरम्यान एकूण २३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले. त्यानुसार भादंवि कलम ३७६ सह बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. दंडातील १५ हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ज्योती दिबाकर यांनी बाजू मांडली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नळे व पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी शितल भोसले व तेजा तुपे यांनी कामकाज पाहिले.
0 Comments