Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारच्या शेटे चौकात ज्वेलर्स शॉप फोडणारे दोघे अटकेत

 


अवधूत ज्वेलर्समधील चोरीचा छडा; मोटारसायकल चोरीचाही गुन्हा उघडकीस, शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाची कारवाई

सातारा : गुरुवार पेठेतील शेटे चौक परिसरातील अवधूत ज्वेलर्सचे दुकान फोडून सोने-चांदीचे दागिने आणि सीसीटीव्ही यंत्रणा चोरणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण १० लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईत ज्वेलर्स दुकानातील चोरीसह मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

रिहान अन्वर शेख (वय २०, रा. शनिवार पेठ, तेलीखड्डा, सातारा) आणि शुभम ऊर्फ सुभाष सुरेश हादगे (वय १९, रा. केसरकर पेठ, मानस हॉटेलमागे, सातारा), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी अवधूत ज्वेलर्सच्या दुकानाच्या शटरचा कडी-कोयंडा तोडून ते उचकटले. दुकानातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचा डीव्हीआर चोरून नेला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

चोरी करताना ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही सोबत नेले होते. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

या तपासादरम्यान अभिलेखावरील सराईत चोरट्याबाबत माहिती मिळाली. तो विनानंबरच्या दुचाकीवरून राजवाडा परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताकडे सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदाराच्या मदतीने सातारा शहरातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरली आणि त्याच दुचाकीवरून अवधूत ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या संशयितालाही शाहूपुरी हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे आणि डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

Post a Comment

0 Comments