Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवाळीपूर्वी दुष्काळी मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा, शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मदत देण्यातील विलंब आणि सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी  प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही मदतीबाबत सरकारकडून केवळ कागदोपत्री काम सुरू आहे. काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश नसल्याने पंचनामे केले जात नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तालुके दुष्काळाच्या यादीत असोत किंवा नसोत, प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे आणि पाहणी सरसकट करावी. कुंभमेळ्यावरील खर्चापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्यावे. 

शरद पवार यांनीही दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांच्या पेन्शन योजनेपासून भरती प्रक्रियेपर्यंतच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. एमपीएससी, नीट परीक्षांतील कथित गैरप्रकारांमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना, सहकारी बँका पक्षीय राजकारणापासून दूर राहायला हव्यात. एखादी व्यक्ती आपल्या पक्षात नाही म्हणून तिला कर्ज नाकारण्याची भूमिका घेतली जात असेल, तर ते चुकीचे आहे. बँकेचा वापर पक्षीय हितासाठी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महायुतीच्या समोर महाविकास आघाडीची दखल घेतली जावी आणि बँक समविचारी लोकांच्या सहकार्याने चांगली चालावी याची दखल घेण्यासाठीच आपण जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनावरून सरकारवर टीका

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. आंदोलनासाठी बळाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने तरुणांमध्ये नाराजी असल्याचे ते म्हणाले. एमपीएससी परीक्षांसंदर्भातील प्रश्नांवर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे परिसरातील विद्यार्थ्यांचा रोष आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments