नुने येथील शेतातील प्रकार; मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
शेतातील सोयाबीन पिकाच्या वाटणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मुलाने लाकडी दांडक्याने आईच्या नाकावर मारल्याने ती जखमी झाली, तर वडिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली. सातारा तालुक्यातील नुने येथील नंदीचा माळ परिसरात १३ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी शालन बबन गायकवाड (वय ६७) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन बबन गायकवाड आणि पूजा अर्जुन गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, शालन गायकवाड या पती बबन यांच्यासोबत गट क्रमांक २११ मधील शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुलगा अर्जुन तेथे आला. शेतातील संपूर्ण सोयाबीन आपल्याला हवे, अशी भूमिका त्याने घेतली. आई-वडिलांनी दीड एकर क्षेत्रातील पिकापैकी अर्धा एकर स्वतःसाठी आणि एक एकर मुलाला देण्याचे सांगितले.
मात्र, या वाटणीवरून वाद वाढला. अर्जुनने आई-वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने आईच्या नाकावर मारहाण केली आणि वडिलांना धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.
0 Comments