Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कोल्हापूर सर्किट बेंच चा अनिल देसाई व राजेंद्र राजपुरे यांना दणका!

दहा वर्षांच्या संचालकपदाच्या मुद्द्यावर दोघांचे उमेदवारी अर्ज ठरले अवैध

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६-२०३१ या पंचवार्षिक कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर 
सर्किट बेंचने बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अनिल देसाई आणि संचालक राजेंद्र राजपुरे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीदरम्यान सलग दोन टर्म संचालक राहिलेले राजेंद्र राजपुरे यांच्या उमेदवारीला संजय मोरे यांनी, तर विद्यमान उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या उमेदवारीला चंद्रकांत कोकाटे यांनी हरकत नोंदवली होती. संबंधित दोन्ही संचालकांचा दहा वर्षांचा संचालकपदाचा कालावधी पूर्ण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
मात्र, सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या हरकती फेटाळून लावल्या. या निर्णयाविरोधात संजय मोरे आणि चंद्रकांत कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले असल्याची माहिती अ‍ॅड. हर्ष अरुण खोत यांनी दिली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर उमेदवारांच्या पात्रतेबाबतही उत्सुकता
दहा वर्षे संचालकपद भूषवलेल्या इतर उमेदवारांच्या पात्रतेबाबतही आता सातारा जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा अन्य उमेदवारांवर परिणाम होणार का, याकडे राजकीय व सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. मात्र, इतर उमेदवारांच्या पात्रतेबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी संबंधित प्रकरणातील न्यायालयीन आदेश आणि तरतुदी तपासणे आवश्यक आहे.
दरम्यान, या निर्णयाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यमान संचालक व बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मातब्बरांच्या उमेदवारी अर्जांवरून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये कोल्हापूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे निवडणुकीला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments