Hot Posts

6/recent/ticker-posts

वरकुटेनजीक दोन एर्टिगा कारची समोरासमोर भीषण धडक; सहा जण जखमी

 भवानी टेक परिसरातील धोकादायक वळण ठरतंय अपघातांचे सत्र; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईबद्दल संताप

​
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
गोंदवले :माण तालुक्यातील म्हसवड–शिंगणापूर राज्यमार्गावर रविवारी (दि. ११) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे दोन एर्टिगा कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील मिळून सहा जण गंभीर जखमी झाले असून, दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक वळणावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​अशी घडली घटना आणि जखमींची नावे: प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त एर्टिगा कारपैकी एक कार (क्र. MH 45 AZ 4052) वरकुटे–म्हसवड येथील बनवस्तीवरील होती, तर दुसरी कार (क्र. MH 04 LY 5388) पिलीव (ता. माळशिरस) येथील होती. रविवारी दुपारी दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याने जोरदार धडक बसली.
​या अपघातात वरकुटे (बनवस्ती) येथील महेश तानाजी चव्हाण (वय २८), सुनंदा तानाजी चव्हाण (वय ४७), सायली महेश चव्हाण (वय २४) आणि गौरी दादा जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. तसेच पिलीव येथील कारमधील समाधान खरात यांच्यासह अन्य एक व्यक्ती असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवले.
​रस्त्याची सदोष रचना ठरतेय जीवघेणी:
म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात असलेले तीव्र वळण आणि रस्त्यावरील टेकडीमुळे समोरून येणारे वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. याच अंधाऱ्या वळणामुळे व सदोष रस्ते रचनेमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. यापूर्वी म्हसवड–मायणी रस्त्यावरील वडजल येथेही अशाच स्वरूपाचा अपघात घडला होता.
​प्रशासन कधी होणार जागे?
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने या धोकादायक ठिकाणाची पाहणी करावी, वळणावर गतिरोधक (Speed Breakers), चेतावणी व सूचना फलक (Warning Boards) बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. भविष्यात मोठी जीवितहानी टळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments