आर्थिक नोंदींची पडताळणी करण्याचे निर्देश; २०२५-२६ चे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनाही नोटीस
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड : जिंती (ता. कराड) येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या आर्थिक कारभारातील कथित अनियमिततेच्या तक्रारीने आता महत्त्वाचे वळण घेतले आहे. संस्थेच्या वार्षिक ताळेबंदातील पोटरक्कम आणि एकूण रकमेतील तफावतीसह आर्थिक व्यवहारांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची सहकार विभागाने दखल घेतली आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह सन २०२५-२६ चे लेखापरीक्षण करणाऱ्या प्रमाणित लेखापरीक्षकांकडूनही खुलासा मागविण्यात आला आहे. कराडच्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत.
जिंती सोसायटीचे सभासद दादासो रामचंद्र चिकटे यांनी २१ ऑक्टोबर रोजी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. संस्थेच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या वार्षिक ताळेबंदात गंभीर आर्थिक तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच आर्थिक अफरातफर, कागदपत्रांमध्ये फेरफार आणि सभासदाला माहिती नाकारल्याचे मुद्दे उपस्थित केले होते.
या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस देण्यात आली आहे. तक्रारीतील मुद्द्यांबाबत सविस्तर, मुद्देनिहाय व वस्तुस्थितीदर्शक खुलासा आवश्यक अभिलेखांसह कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लेखापरीक्षकांनाही खुलासा देण्याच्या सूचना
या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे संस्थेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करणारे प्रमाणित लेखापरीक्षक जे. काकडे यांनाही स्वतंत्रपणे सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारीत नमूद केलेल्या ताळेबंदातील पोटरक्कम आणि एकूण रकमेतील तफावतीच्या अनुषंगाने तसेच आर्थिक पत्रकांशी संबंधित मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण व खुलासा तातडीने कार्यालयात सादर करावा, असे उपनिबंधकांनी कळविले आहे.
त्यामुळे आता केवळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाच नव्हे, तर संबंधित आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनाही ताळेबंदातील तफावतीबाबत भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
दरम्यान, तक्रारदाराने मूळ अभिलेख जप्त करणे, विशेष लेखापरीक्षण आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. सहकार विभागाच्या या नोटिशीनंतर अध्यक्ष, सचिव आणि लेखापरीक्षक काय खुलासा सादर करतात, तसेच पुढील चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून संबंधितांचा खुलासा आणि विभागीय चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
0 Comments