सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढताना भाजपने जागावाटपाचा निर्णय प्रामाणिकपणे अंमलात आणला; मात्र मित्रपक्षांकडून त्याच पद्धतीने युतीधर्म पाळला गेला नाही. काही ठिकाणी मित्रपक्षांनीच भाजपच्या उमेदवारांना अडचणीत आणल्याने विजयाच्या संधी हुकल्या. भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली असती, तर जिल्हा बँकेच्या सर्व जागांवर पक्षाचा झेंडा फडकला असता. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही स्वबळावर भाजपला सत्ता मिळविण्याची ताकद आहे, असा ठाम विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानातून महायुतीतील अंतर्गत कुरबुरींसह आगामी निवडणुकीत स्वबळाच्या पर्यायाचे संकेत मिळाले आहेत.
जिल्हा बँकेच्या निकालानंतर साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अरुण गोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या सूचनेनुसार झाला होता. वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करून भाजपने जागावाटप स्वीकारले. ज्या मतदारसंघात मित्रपक्षाचा उमेदवार होता, तेथे त्याच्या विजयासाठी भाजपने ताकद लावली. मात्र, काही ठिकाणी मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. शब्दाला जागणे आणि दिलेला पाठिंबा प्रामाणिकपणे निभावणे ही आमची भूमिका आहे. मात्र, युतीतील सर्वांनीच ती भूमिका घेतली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
अर्जुन काळे यांच्या विजयाचा दाखला देत गोरे यांनी महायुतीतील काही घटकांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले. माणमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ११६ मते, तर खटावमध्ये राष्ट्रवादीला १४४ आणि भाजपला ११२ मते मिळाली. पाटणमध्ये महायुतीच्या उमेदवाराला १०४, तर अपक्षाला ९९ मते मिळाली. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चांगले मतदान घेतले; मात्र समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांना अवघ्या पाच मतांनी पराभव स्वीकारावा लागला. कोरेगावमध्येही अपेक्षित निकाल लागला नाही. या मतदारसंघांतील मतदानाचे संदर्भ देत त्यांनी महायुतीतील विसंवादावर बोट ठेवले.
बँकेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप नको
निवडणुकीतील राजकीय संघर्ष बँकेच्या कामकाजात आणू नये, अशी भूमिका गोरे यांनी मांडली. जिल्हा बँक ही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून तिच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. निवडणूक संपली आहे. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून बँकेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. 'जो दे उसका भला... जो न दे उसकाही भला...' अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरेगावमधील चिठ्ठी प्रकरणावर भाष्य करताना विजयी सदस्याने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळविला, ही कौतुकास्पद बाब आहे. विमुक्त आणि भटक्या समाजातील उमेदवाराला महायुतीतील सर्व घटकांचे अपेक्षित पाठबळ मिळाले नसतानाही त्यांनी विजय संपादन केला, असे गोरे म्हणाले.
अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारले असता, या प्रक्रियेची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. तथापि, अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. पक्षाचे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
पदवीधर निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही काही ठिकाणी निकालावर परिणाम घडविण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीतून भाजपला अनेक राजकीय धडे मिळाले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमक आणि ठाम भूमिका घेईल, असेही त्यांनी सूचित केले. 'मला लढायला माहीत आहे,' या विधानातून गोरे यांनी विरोधकांबरोबरच महायुतीतील मित्रपक्षांनाही स्पष्ट संदेश दिला.

0 Comments