घरात तीन महिन्यांची मुलगी असल्याने फटाके फोडण्यास विरोध; मेढा पोलीस ठाण्याबाहेरच हल्ला झाल्याचा आरोप
वरोशी / जावळी : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर वरोशी येथे काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत वाद होऊन मारहाणीची घटना घडली. घरात तीन महिन्यांची मुलगी असल्याने फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार ज्ञानदेव किसन रांजणे यांच्या समर्थकांनी वरोशी गावात मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यावेळी फटाके घराच्या दिशेने उडवले जात असल्याने अतिश कदम यांच्या आई संगीता कदम यांनी घरात तीन महिन्यांची मुलगी असल्याचे सांगून त्या ठिकाणी फटाके फोडू नयेत, अशी विनंती केली. यावरून संबंधितांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर अतिश कदम हे तक्रार देण्यासाठी सहकाऱ्यांसह मेढा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलीस ठाण्याबाहेरच तिघांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अतिश संतोष कदम (वय २६, रा. वरोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप मोहन कासुर्डे (रा. वरोशी), गणेश विष्णू शिंदे (रा. मेढा) आणि अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मारहाणीची घटना पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याचा दावा करत परिसरातील सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अतिश कदम यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलीस करीत आहेत.

0 Comments