Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य जनतेच्या पाठबळावर मी घडलोय -ना. महादेव जानकर


वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मी खानदानी राजकारणी नाही, सामान्य जनतेच्या पाठबळावर मी घडलोय, त्यामुळे मी जे काही करणार आहे ते समाजासाठी. माझी लढाई उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी आहे असे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. दहिवडी (ता. माण) येथील बाजार पटांगणावर राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुंडलिक काळे, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एस. अक्कीसागर, प्रदेश महासचिव बाळासाहेब दोलताडे, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष ताजुद्दीन मणेर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रध्दाताई भातंबेकर, प्रदेश सचिव डॉ. उज्वला हाके, राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, भाऊसाहेब वाघ, नितीन धायगुडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांडगे-पाटील, सरचिटणीस आण्णासाहेब रुपनवर, जिल्हा नियोजन सदस्य काशिनाथ शेवते, संपर्कप्रमुख खंडेराव सरक, प्रा. शिवाजीराव महानवर, डॉ. प्रमोद गावडे, पुजा घाडगे,पंचायत समिती सदस्या लतिका विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महादेव जानकर म्हणाले की, मला नेता मराठवाड्यानं बनवलं माणनं फक्त जन्मच दिला. सर्व देशात पक्ष वाढत असताना जिथं मी जन्माला आलो तिथं माझा एकही लोकप्रतिनिधी नसावा ही शोकांतिका आहे. फक्त मेळाव्यासाठी गर्दी जमवून विजयी होता येणार नाही त्यासाठी वॉर्डापासून काम करण्याची गरज आहे. आजची सभा ही जिंकण्याचा विश्वास देण्यासाठी आहे. सर्व पक्षाचे नेते माझे जवळचे मित्र आहेत. रासपची सर्वत्र मोठी ताकद तयार होत आहे. जानकर पुढे म्हणाले की पाणी देऊ म्हणणारे पवारसाहेब निवृत्तीला आले तरी माणला पाणी आलं नाही. ज्यांनी पाणी पळवलं त्यांच्या मागं तुम्ही जाताय. पण एक लक्षात ठेवा माण-खटावचा सर्वांगिण विकास मीच करणार आहे. कपाळावरील दुष्काळाचा शिक्का पुसायचा असेल तर आम्ही दिलेला उमेदवार निवडून द्या. आगामी निवडणुकीत भाजप व रासपची युती निश्चित आहे. मी बारामतीतूनच लढणार आहे पण माढ्यातूनही रासप लोकसभा लढविणार आहे.

कमळाबरोबर कपबशी फुलवा अशी आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे. येत्या काही दिवसात दोन महामंडळांची अध्यक्षपदे व अठरा सदस्यपद रासपला मिळणार आहेत. आमची युती तोडून देणार नाही हा माझा शब्द आहे. तुम्ही साथ दिली तर दुधात साखर, पण नाही दिली तरी मी दिल्लीत जाणार हे निश्चित.
 जानकर पुढे म्हणाले की, माझ्या खात्याचा यापुर्वी 140 कोटीचा असलेला कारभार मी साडेसात हजार कोटीवर नेला. मत्स्य व्यवसायासाठी एक हजार कोटीचं वेगळं बजेट तयार केलं आहे. जनावरांच्या उपचारासाठी रुग्णवाहिकेची सेवा आणली आहे. गो शाळेसाठी 34 कोटी दिले आहेत. यापुढे तालुकाच नव्हे तर गावासाठी एक कोटी देण्याचा मानस आहे.


शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. दोनशे रुपयांचे जनावरांच्या खाद्याचे पोते वीस रुपयाला मिळेल असा माझा प्रयत्न आहे. यापुढे दुध संस्थांनी शेतकऱ्यांना दुधाचा दर पंचवीस रुपयांपेक्षा कमी दिला तर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. दुधासाठी लिटरला चार रुपये अनुदान शासन देणार आहे. यामुळे महिन्याला दोनशे चाळीस कोटी रुपयांचा ताण शासनावर पडणार आहे.
कार्यकर्त्यांना सल्ला देताना जानकर म्हणाले की, पक्षाला जातीत अडकवू नका. प्रशासनाशी सख्य राखून काम करा. कामातून मोठं व्हा फ्लेक्स लावून कोणी मोठं होत नसतं. आपण पक्षासाठी काय देतोय हे पण पहा. जिथं जो समाज माझ्यासोबत आला तिथं त्यांना संधी दिली. मी खोटं बोलून मत घेणार नाही. तुमचा पक्ष म्हणून रासपला तन-मन-धनाने साथ द्या.

बाळासाहेब दोलताडे म्हणाले की शेतकऱ्यांचा विकास हाच रासपचा ध्यास असून शेतकऱ्यांना उद्योजक बनण्यास मदतीच्या ठरतील अशा योजना जानकरसाहेबांनी आखल्या आहेत. भाऊसाहेब वाघ म्हणाले की, आपले दहा-पंधरा खासदार व पन्नास-साठ आमदार निवडून आणले पाहिजेत तर आपण सरकारला हलवून सोडू. मामूशेठ विरकर म्हणाले की, माणचा आगामी आमदार रासपचा असेल यात तिळमात्र शंका नाही. साहेबांमुळेच दुधाची आधारभूत किंमत नऊ रुपयांनी वाढून अठरावरुन सत्तावीस झाली आहे. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्ती व महिलांचा जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुपारी मेळावा असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

Post a Comment

0 Comments