तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 5, 2018

तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा समाजावर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खासदार छात्रपती उदयराजे भोसले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थितीत होते. या परिषदेत मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल यावर मंथन झाले.
उदयनराजे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईलच पण आत्महत्या किंवा तोडफोड करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील सरकारने आणि आत्ताच्या सरकारनेदेखील दुर्लक्ष केल्यानेच आरक्षणाचा प्रश्‍न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले. मुलभूत अधिकारांसाठी भिकार्‍यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. त्यावेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरजच भासली नसती. सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा अन्यथा उद्रेक होईल. आम्ही न्याय हातात घेतला तर याला सरकारच जबाबदार असेल. आरक्षणावरून सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार, मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही ते एकदाच सरकारने स्पष्ट सांगावे. आज जीव देणारे, उद्या जीव घेतील. लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. आरक्षणासाठी कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणून देऊ नका. अन्यथा अनर्थ होईल.
कायद्याचे कारण सरकारने पुढे करू नये
कायद्याचे कारण सरकार पुढे करत आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत आहे. 82 टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहिली पाहिजे. मराठा समाजात मागासांची संख्या जास्त आहे. 30 वर्षांपासून मराठा आरक्षणावर फक्त चर्चाच होत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर इतकी चर्चा कशाला, मागील आणि सध्याच्या सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. समिती आयोगामध्येच 5 वर्षे वाया गेली. संपूर्ण एक पिढी ऐन उमेदीच्या काळात वंचित राहिली आणि दिशाहीन झाली, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.
राजेंकडे समन्वयकाची जबाबदारी
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला सध्या दिशा नसल्याने ते भरकटले आहे. या आंदोलनाला योग्य दिशा मिळावी आणि इतर कोणीही या मोर्चाचे नेतृत्व करू नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य समन्वयकाची जबाबदारी रविवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हाती सोपविण्याचा ठराव समंत करण्यात आला.
रेसिडेन्सी क्लब याठिकाणी राज्यातील मराठा क्रांती मोर्चाची दुसरी तातडीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना आंदोलकांनी शिस्तीचे पालन करावे, असे भावानिक आवाहनही उदयनराजे यांनी केले. 9 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत स्थानिक पातळीवर जिल्हास्तरीय समन्वयकाने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. बैठकीत अनेक समन्वयकांनी घटनात्मक आरक्षणाचा आग्रह धरला. या बैठकीत आंदोलनकर्त्यांना सरकारकडून समाजकंटक म्हणून होत असलेल्या विरोधाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक, मराठा क्रांती मोर्चाचे विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, सकल मराठा समाजाचे समन्वयक बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते.
सुमारे चार तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत अनेक समन्वयकांनी 9 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात यावे असाही आग्रह धरला यावर बरीच चर्चा झाली. कोल्हापूरचे सुरेश पाटील म्हणाले, राज्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कार्यक्रमासाठी बंदी घालण्यात यावी अशी सूचना केली.
यावेळी नागपूरच्या छत्रपतींचा संदेश वाचण्यात आला.
त्या संदेशात त्यांनी छत्रपती उदयनराजे यांनी मराठा मोर्चा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करावे,अशी सूचना केली होती. मराठ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.
घटनेने अधिकार देऊन आणि लोकप्रतिनिधी आपल्या समाजाचे असताना आरक्षण का? मिळत नाही, असा सवाल केला. शांताराम कुंजीर यांनी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक म्हणून उदयनराजे यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात यावी, असा ठराव मांडला. या ठरावाला बाळासाहेब अमराळे यांनी अनुमोदन दिले.

No comments:

Post a Comment