आरोग्यासाठी धावायचे तर पैसे देऊन कशाला? संतप्त सातारकरांचा सवाल, सात तास जनजीवन होणार ठप्प - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 1, 2018

आरोग्यासाठी धावायचे तर पैसे देऊन कशाला? संतप्त सातारकरांचा सवाल, सात तास जनजीवन होणार ठप्प


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
पैसे देऊन धावण्याची एक स्पर्धा रविवारी सातार्‍यात होत आहे. ‘रन फॉर हेल्थ’, अशा गोंडस नावाखाली तब्बल सात तास शहर परिसरासह परळी खोरे, कास पठार, आसनगाव भागातील नागरिकांचे जनजीवन ठप्प होणार आहे. त्यामुळे आरोग्यासाठी धावायचेच असेल तर त्यासाठी असल्या मॅरेथॉन नामक स्पर्धा कशाला हव्यात? असा संतप्त सवाल सातारकर विचारत आहेत.
गेले सात वर्षे झाले सातार्‍यात ही धावण्याची स्पर्धा भरवली जात आहे. काय तर म्हणे या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सातार्‍याचे नाव होणार. किती हास्यास्पद गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेले सातारा आधीच जगप्रसिद्ध आहे मग असल्या शंभर साठ स्पर्धा झाल्या तरी काय फरक पडतो. रविवारी होणार्‍या या स्पर्धांच्या पूर्वसंध्येला अनेक सातारकरांनी सत्य सह्याद्री कडे याबाबतची दुसरी बाजू मांडली.
पालिकेला पडलीय बड्या धेंडांची
पालिकेने तातडीने या धावण्याच्या मार्गावरील खड्डे भरून घेतले. नगराध्यक्षांनी तर स्वत: जातीने  हे खड्डे भरले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवले. गेले चार महिने सातारकर नागरिक याच खड्ड्यांमधून आपली वाहने नेत आहेत तेव्हा पालिकेला खड्डे भरण्याचे सुचले नाही. परंतु, पैसे देऊन धावणार्‍या एखाद्याचा पाय मुरगळला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातार्‍याची बदनामी नको म्हणून तातडीने हे खड्डे भरले गेले, असा अजब कारभार आहे. पालिकेला सामान्य नागरिकांचे काही देणेघेणे नसल्याचे सिद्ध झाले आहे.
याशिवाय हा मार्ग असा चकाचक करण्यात आला आहे की बाहेरून आलेल्याला वाटावे सातारा किती सुंदर शहर आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात कचरा कुंड्या ओसंडून वाहात होत्या. गेल्या वर्षी झालेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ व सुंदर स्पर्धेत सातारा कुठेच नव्हता. मग आताच हे स्वच्छतेचे नाटक कशासाठी? यातून कुणाचे हित जोपासले जात आहे? असे प्रश्‍न विचारले जात आहेत.
पैसे देऊन पळायचं असतंय व्हयं
रविवारी होणार्‍या या स्पर्धांना हजारो रुपयांची प्रवेश फी आहे, असे सांगताच एका सामान्य नागरिकाने पैसे देऊन पळायचं असतंय व्हयं, असा प्रतिप्रश्‍न केला. आमाला वाटलं ही समदी फुकटातचं पळत्याती, अशी अस्सल सातारी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाय या स्पर्धांना मोठमोठे प्रायोजक असून ते जर लाखो रुपयांची बक्षीसे देणार असतील तर मग प्रवेश फी कशासाठी, असेही काहीजणांनी विचारले.
शेतकरी, कामगार, दूध, पेपर यांची गैरसोय
परळी खोरे, कास पठार, आसनगाव या भागातून अनेक शेतकरी आपला शेतमाल सातार्‍यात आणतात. रविवारचा बाजार असल्याने हे प्रमाण जास्त असते. आता खुद्द एसपींनीच पहाटे चार पासून 11 वाजेपर्यंत रस्ता बंद केल्याने त्यांना द्राविडी प्राणायाम करून सातार्‍यात यावे लागणार आहे. काही गावांना तर पर्यायी मार्गच नाहीत त्यांना तर घरातच बसावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याचा परिणाम त्यांच्या आठवडाभराच्या जीवनावर होणार आहे. रविवार जरी सुटीचा दिवस असला तरी औद्योगिक वसाहत ही मंगळवारी बंद असते. तर खासगी आस्थापना शनिवारी बंद असतात त्यामुळे या भागातून 11 वाजेपर्यंत त्यांनी सातारा शहरात कसे पोचायचे त्यामुळे त्यांच्यापुढेही यक्षप्रश्‍न आहेत.
याशिवाय धावण्याच्या मार्गावरील गल्लीबोळातून येणारे अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहेच. पण, पहाटेच्या वेळेत चालणार्‍या वृत्तपत्र वितरणावरही याचा परिणाम होणार आहे.
स्पर्धा वादातीत
ही स्पर्धा सुरु झाल्यापासून वादातीत आहे. अनेकांनी यावर आक्षेप नोंदवले असले तरी सर्व यंत्रणा मॅनेज करण्यात येत असल्याची चर्चा असल्याने स्पर्धेची एकच बाजू सातत्याने पुढे येत होती. गेल्या वर्षी सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभिकरणावरून मोठा राडा झाला होता. त्यामुळे अशा स्पर्धा कशासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी घेतल्या जात आहेत, अशीही विचारणा होत आहे. (क्रमश:)

No comments:

Post a Comment