विसर्जनाचा प्रश्न सुटल्याने हौद आले चर्चेत पालिका सभेत एलईडी भ्रष्टाचार आणि हौदाच्या चोरीवर खल - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 12, 2018

विसर्जनाचा प्रश्न सुटल्याने हौद आले चर्चेत पालिका सभेत एलईडी भ्रष्टाचार आणि हौदाच्या चोरीवर खल


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा: शहरातील रस्त्यावर उजेड पाडणाऱ्या प्रज्वल भारत कंपनीची बेबंदशाही आणि हौदाच्या सुशोभीकरणाच्या मुद्यावर मंगळवार पेठेतील डफळे हौद चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट अण्णा लेवे यांनी पालिका सभेत केल्याने दोन तास रंगलेल्या सभेत वादळी चर्चा झाली. तदनंतर झालेल्या स्थायी समितीच्या तहकूब बैठकीत अवघ्या १५ मि. २६४ विषय मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभा संपन्न झाल्या. ढोरगल्लीतील विरशैव कक्कया समाजाचे सक्रीय कार्यकर्ते महेंद्र तपासे यांच्या निधनामुळे त्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
गणेशोत्सव तोंडावर असल्याने शहरातील आरोग्याचे तीन तेरा वाजल्याचा मुद्दा बहुतांश सदस्यांनी मांडला. सिद्धी पवार आणि दीपलक्ष्मी नाईक यांनी नागरिकांच्या जीवाशी पालिकेचा खेळ सुरु असल्याचे स्पष्ट केले. नाईक यांनी आरोग्य सेवा पुरवताना दुजाभाव केला जात असल्याचे सांगून मल्हार पेठेतील महेंद्र तपासे या तरुण रिक्षा चालक मुलाचा बळी गेल्याचे सांगितले. तदनंतर अजेंड्यावरील विषय घेण्यात आले. यावेळी प्रज्वल भारत कंपनीने शासनापेक्षा कमी दरात सेवा दिली असल्याने शासनापेक्षा प्रज्वल भारत कंपनीकडून शहरातील राहिलेले काम करून घ्यावे, अशी उपसूचना विरोधी पक्षाने दिली. यावर प्रशासन वेळेत काम करत नसल्याने सदस्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रज्वल भारत कंपनीने पालिकेला ओरबडण्याचे काम केले असून या कंपनीला पालिकेने दत्तक घेतले आहे का, असा सवाल अण्णा लेवे यांनी उपस्थित केला. मंगळवार पेठेतील पाण्याच्या हौदाचे सुशोभीकरण करण्याचा विषय आल्यानंतर हे काम झाले पाहीजे. मात्र, पालिकेच्या नावे असलेला डफळे हौद चोरीला गेला असून कोणत्या अधिकाऱ्यांनी तो बिल्डरच्या घशात घातला आहे? असा सवाल निर्माण करण्यात आला. यावेळी खुलासा करताना मुख्याधिकारी गोरे म्हणाले, १ मंगळवार पेठ येथे असणाऱ्या ऐतिहासिक डफळे हौद प्रकरणी चौकशी करून पुढील सभेत अहवाल मांडण्यात येईल. मात्र, लेवे यांचे समाधान न झाल्याने पालिका मिळकती बिल्डरांच्या घशात जाताना नियोजन विभागातील अधिकारी झोपले होते का, असा सवाल करत त्या हौदावर उभा राहिलेल्या इमारतीला मंजुरी दिलीच कशी? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती केली. लत्ता पवार म्हणाल्या, ‘पालिकेच्या जागा, हौद आणि इमारती हे कोणीही उठावे आणि काहीही थाटावे’ अशा अविर्भावात प्रशासनाला हाताशी धरून कारभार सुरु आहे. त्यामुळे दोषी पालिका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहीजे, म्हणजे कायद्याचा धाक राहील. जर कारवाई होणार नसेल तर उपयोग नाही. सदस्यांनाच नेहमी टीकेचे धनी व्हावे लागत असल्याने अशी प्रकरणे गांभीर्याने घ्यावीत. सखोल चर्चेनंतर दोन्ही विषय मंजूर करण्यात आले.

सर्वसाधारण दोन तासात तर स्थायी १५ मि. आटोपली

तहकूब स्थायी समितीची सभेत २६४ विषयांना १५ मिनिटात मंजुरी दिली गेली असली तरी तत्पूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील ३ विषय मंजुरीसाठी दोन तास खल झाला. त्यामुळे स्थायी समितीतील एकाधिकारशाही उघड झाली आहे. मागील सभा विषयांच्या सूचना नसल्याने तहकूब करण्यात आली होती. मात्र, मोरेंच्या उपसूचना ते गैरहजर राहील्याने आल्याच नाहीत, का मोरे सत्ताधाऱ्यांना मिळालेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृत्रिम तळ्याचा भस्मासुर बुडवत उच्च न्यायालयाने मंगळवार तळे खाजगी असल्याने त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सूचित केल्याने काटवटे यांनी सभागृहात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर कृत्रिम तळ्याला सर्वस्तरातून विरोध असताना हा नागरिकांच्या विचाराचा सन्मान असल्याचे सांगत अशोक मोने यांनी काटवटेंना अनुमोदन दिले.

No comments:

Post a Comment